ऋतंभरा प्रज्ञेचे धनी संतश्री ज्ञानेश्वरदास.

बाळासाहेब नेरकर कडुन
पृथ्वीतलावर बहुतांश लोक जन्मतः सर्वसामान्य माणसांप्रमाणेच असतात. त्यातील काही ज्ञानार्जनाकरिता आजन्म पितामह भीष्माप्रमाणे प्रतिज्ञाबद्ध होऊन राजा भगीरथा सारखे अथक प्रयत्न करीत , ज्ञानगंगा प्राप्त करून घेत स्वतःचे अलौकिकत्व जगतासमोर सिद्ध करून आदर्श प्रयत्नवादी बनत असतात.
तर काहींना पूर्वजनाचे सुकृत व जन्माच्या निष्काम सेवने योग्य श्रीगुरु प्राप्त होतात .आणि त्यांनी दिलेल्या स्पर्श दीक्षेच्या माध्यमातून ते अविलंब समुद्राप्रमाणे सखोल अर्थभरीतअथांग असणाऱ्या अमर्याद तत्त्वज्ञानाचे अनभिषिक्त एकछत्र सम्राट होत असतात. काही अलौकिक व्यक्तीमत्वे या दोन्हीपेक्षा भिन्न असून , त्यांना ज्ञानार्जनासाठी एखादे तीर्थक्षेत्र अथवा निर्जनवनात जाऊन साधना करावी लागत नाही . किंवा श्रीगुरुद्वारा होणाऱ्या शक्तिपाताची सुद्धा आवश्यकता भासत नाही . कारण ते उपजतच ज्ञान घेऊन या अवनीतलावर अवतीर्ण झालेले असतात. अशाच उपजतच ऋतंभरा प्रज्ञेचे धनी संत श्री ज्ञानेश्वरदास उपाख्य श्री संत वासुदेवजी महाराज हे होत.
पवित्र ते कुळ पावन तो देश l जेथे हरीचे दास जन्म घेती ll
या जगद्गुरुंच्या वचनानुसार योगी सम्राट गजानन महाराजांचे कृपांकित असणारे त्यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य राजर्षी संत श्री भास्कर महाराजांच्या पवित्र जायले कुळामध्ये अनेक ऋषीमुनी , संत महात्मे यांची तपस्थली व अवतारादिकांच्या पादस्पर्शाने पुनित झालेल्या सातपुडा पर्वतरांगेच्या पवित्रतम् पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक अकोली जहागीर नाम एका छोट्याशा खेड्यात दि.२४ l २ l १९१७ फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८३९ शनिवार रोजी सकाळी सात वाजता साध्वीमाता चंद्रभागादेवी तथा पिताश्री पुंडलिकराव पाटील जायले या भक्तव्दयांच्या उदरी त्यांच्या अनंत जन्माच्या पुण्याईचे फलस्वरूप श्री संत ज्ञानेश्वरदासांच्या रूपाने एका तापरहित असणाऱ्या ज्ञान सूर्याचा उदय झाला. किंबहुना अखिल विश्वाला मेजवानी देऊन पुरुन उरणाऱ्या तत्त्वज्ञानाचा जणू गोड अथांग समुद्र प्रगट झाला.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले l उद्धरावया आले मूढजना ll
भारतीय ऐक्याचे महान प्रतीक असणाऱ्या संत शिरोमणी नामदेवरायांच्या या वचनानुसार, ब्रम्हाला ब्रह्मरूपात राहून संपूर्ण विश्वाचा उद्धार करीता येणे शक्य नसल्यामुळे, तेच ब्रह्म संत रूपाने या अवनीतलावर अवतीर्ण होऊन संपूर्ण जडमुढांचा उद्धार करण्यास कारणीभूत होत असते. या मृत्यूलोकांमध्ये मनुष्यरूपाने विचारण करणाऱ्या तिघांपैकी जीवामध्ये इच्छा खूप असतात परंतु सामर्थ्याच्या अभाव असल्यामुळे त्या पूर्णत्वास जात नाहीत. ब्रम्हा मध्ये सामर्थ्य संपन्नता असतांनाही इच्छेच्या अभावी उपरोक्त कार्य घडत नाही. म्हणून ते ब्रह्म इच्छेसह सामर्थ्य घेऊन वासुदेवजी महाराजांसारख्या संतरूपाने अवतीर्ण झाल्यामुळेच जगदोद्धाराचे महद्कार्य त्यांच्याकडून होत असते.
मोटकी देहाकृती उमटे l आणि निजज्ञानाची पहांट फूटे l
सूर्यापुढा प्रगटे l प्रकाशु जैसा ll
या भगवान श्री ज्ञानेशांच्या वचनानुसार योगभ्रष्ट महात्म्यांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अल्पवयातच स्वरूप ज्ञानाचा उदय होतो . अर्थातच सुरुवातीला देहाचा लहानसा आकार प्रगट होतो , आणि आत्मज्ञानाची जणू पहाटच होते . ज्याप्रमाणे सूर्योदय होण्यापूर्वी सूर्याच्या पुढे प्रकाश जसा प्रगट होत असतो . अगदी त्याचप्रमाणे गुरुवर्य महाराजांची सुद्धा अवस्था होती . म्हणूनच त्यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी १९२२ साली अमरावती जिल्ह्यातील काळगव्हाण नामक ग्रामातील श्रीराम मंदिरात रामनवमीचे ” संत चरणरज लागता सहज l वासनेचे बीज जळूनी जाय ll ” या जगद्गुरुंच्या संतपर प्रकरणातील अभंगावर नैमित्तिक कीर्तन करून , उपस्थित सर्व भक्त मंडळींना स्वतःच्या योगभ्रष्ट अवस्थेची प्रतिती आणून दिली. अगदी काल परवापर्यंत त्या किर्तन प्रसंगाचे प्रत्यक्षदर्शी तेथील इत्थंभूत माहिती पुढच्या पिढीकडे संक्रमित करीत होते. कारण अशा उच्च कोटीच्या महात्म्यांना अवस्थेची वाट न पाहता आणि प्रौढ वयाच्या गावाला न येता, नैष्टिक बालब्रह्मचारी असताना सुद्धा सर्वज्ञतारूपी सर्वांग सुंदर नोवरी स्वेच्छेने वरमाला घालून वरले होते. आणि ती सर्वज्ञतारूपी पतिव्रता त्यांच्या सावलीप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची सहधर्मिनी म्हणून त्यांच्या सोबतच होती . म्हणूनच त्यांना विस्मरणादि दोषाचा शेवटच्या श्वासापर्यंत स्पर्श सुद्धा झाला नाही . आणि जरा जर झालेल्या शारीरिक स्थितीवर मात करीन वैकुंठ गमनाच्या अगदी अगोदरच्या दिवसपर्यंत वयाच्या पाचव्या वर्षी उगम पावलेली ही कीर्तनाची अनस्यूत ज्ञानगंगा भगवान पंढरीशरुपी महासमुद्राला जाऊन मिळेल पर्यंत अखंड खळखळ वाहतच होती. अशा अलौकिक ऋतुंभरा प्रज्ञाचे धनी असणाऱ्या ज्ञानेश्वरदास उपाख्य संत श्री वासुदेवजी महाराज यांच्या १०८ व्या अवतिर्णोत्सवाच्या निमित्ताने हे शब्द सुमन त्यांचे चरणी समर्पित.
श्री ज्ञानेश्वर दासानुदास
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.