गोंडवाना कृती समीती च्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन
आदिवासी राजा महात्मा रावण यांचे दहन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा
लाखनी / रोशन खोब्रागडे
हिंदू रितीरीवाजानुसार दसरा सणाला हिंसा व वाईटाचे प्रतीक समजून रावणाचे दहन केले जाते. ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे परंतु या प्रकारामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावत असल्याची तक्रार गोंडवाना कृती समिती भंडारा जिल्हा यांनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आदिवासी राजा महात्मा रावण हे आदिवासींचे पूर्वज असून दैवतसुद्धा आहेत. समस्त आदिवासी समाजात त्यांच्याबद्दल आस्था आहे. मध्यप्रदेशात महात्मा रावण यांचे मंदीर असून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हयातही त्यांचे मंदिर आहे. रामटेक व नागपूर जिल्हयातही रावणाची पूजाअर्चा केली जाते. परंतु हिंदू धर्मातील काही धार्मिक संघटना दसरा सणाच्या दिवशी आदिवासी राजा महात्मा रावण यांच्या पुतळ्याचे दहन करतात.
यांमुळे समस्त आदिवासी समाजाच्या व जनजातींच्या भावना दुखावल्या जात आहेत. आदिवासी जनतेमध्ये जाणूनबुजून आक्रोश निर्माण केला जात आहे. राजा महात्मा रावण यांच्या पुतळ्याचे दहन प्रथा बंद होणे गरजेचे आहे. तसे न केल्यास आदिवासी जनजातींद्वारे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे निवेदनात नमुद केले आहे. त्याचप्रमाणे राजा रावण यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम १५३ (अ) , २९५ (अ) व कलम २९८ नुसार व मुंबई पोलिस ॲक्ट १३४ , १३५ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी गोंडवाना कृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष विकास मरसकोल्हे , उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद परतेती , सचिव हरिप्रसाद वाडीवे , सहसचिव गजानन उईके , कोषाध्यक्ष घनश्याम कुंभरे तसेच महीला प्रतिनिधी प्रभाताई पेंदाम , तिजाबाई मरसकोल्हे , ममताबाई मरसकोल्हे , पूजा वाडीवे व प्रमिला कुसराम व सदस्यांपैकी रोशन सावतवान , राजकुमार वाडीवे , अशोक भलावी इ. उपस्थित होते.