फेसबुक मैत्री , सुनेवर प्रतिबंध आणि सासू सासऱ्याची हत्या
प्रेमात मनुष्य सर्व मर्यादा ओलांडतात. त्यांना या काळात स्वहिताशिवाय काहीच कळत नाही. त्यांना कोणी योग्य सल्ला दिला तर त्यांना तो अयोग्य वाटतो. प्रेमात पडलेल्या सुनेवर पती आणि सासऱ्याने निर्बंध घातल्या नंतर सुनेने प्रियकराच्या मदतीने सासू सासऱ्याची हत्या केल्याची घटना दिल्लीच्या गोकुळपुर येथे घडली आहे. पोलिसांनी या हत्याकाडांचा शोध लावला असून सुनेला अटक केली आहे. प्रियकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गोकुळपुरी येथील एका घरात वृद्ध जोडप्याचा मृतदेह आढळून आला. सकाळी साडेसातच्या सुमारास या दाम्पत्याच्या मुलाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी (Police) येऊन तपास सुरू केला. सुरुवातीच्या तपासात हल्लेखोरांनी कोणताही दरवाजा तोडून घरात प्रवेश केला नसून, त्यांचा प्रवेश मैत्रीपूर्ण असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. अशा स्थितीत पोलिसांना घरात उपस्थित असलेल्या लोकांवर संशय आला. पोलिसांनी या दाम्पत्याचा मुलगा आणि सुनेची चौकशीही केली.
चार महिन्यांपूर्वी रचला कट
सुनेला प्रश्न विचारला असता ती नीट उत्तर देऊ शकली नाही. यानंतर पोलिसांना संशय आल्याने तिचा मोबाईल तपासण्यात आला. यादरम्यान आशिष नावाच्या तरुणाशी अनेकवेळा तिचे फोनवरून बोलणे झाल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने दुहेरी हत्याकांड कसे घडले ते सांगितले. (Crime News)
सुनेने सांगितले की 2020 मध्ये तिची आशिषशी फेसबुकवरून मैत्री झाली होती. काही दिवसांनी मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विवाहित असूनही ती आशिषला हॉटेलमध्ये भेटत होती. दोघेही फोनवर खूप बोलायचे.
नवऱ्याने तिचा मोबाईल तपासला असता संपूर्ण पोलखोल झाली. यानंतर पती आणि सासूने तिचा फोन जप्त केला आणि तिच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर तिला घराबाहेर पडण्यापासूनही रोखलं होतं. तिला स्मार्ट फोनऐवजी सामान्य फोन देण्यात आला.
कटानुसार दोघांनी दोन नवीन सिमकार्ड घेतले आणि त्या नंबरवरून बोलत होते, जेणेकरून तिच्या संभाषणाची कोणाला माहिती मिळू नये. फोनवर बोलून दोघांनी घटना घडवून आणण्यासाठी रविवारचा दिवस निवडला. आशिष आणि त्याचा साथीदार रविवारी रात्री सात वाजता तिच्या घरी पोहोचले. सुनेने घराचा दरवाजा उघडून दोघांना आत घेतले. यानंतर दोघेही घरी लपून बसले होते.सुनेने सांगितले की, सासू-सासऱ्यांच्या निर्बंधांमुळे मोनिका प्रियकर आशिषला भेटू शकत नव्हती. सासरच्या मंडळींमुळे आशिषला भेटता येणार नाही, असे तिला वाटू लागले होते. अशा स्थितीत डिसेंबरमध्येच सुनेने आशिषसह वृद्ध जोडप्याची हत्या करण्याचा कट रचला.
रात्री 10.30 वाजेपर्यंत घरातील सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. यानंतर आशिष आणि त्याच्या साथीदाराने दाम्पत्याची हत्या करून दरोडा टाकला. सोमवारी सकाळी पतीला जाग आली तेव्हा आई-वडिलांचा खून झाल्याचे पाहून तो घाबरला. यानंतर त्यांनी पत्नीला उठवले. दोघांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी सुनेला अटक केली असून प्रियकराचा शोध सुरू आहे.