क्राइम

महिला मॅनेजरवर सहकाऱ्यांकडून कार मध्ये बलात्कार , डॅशकॅम मुळे झाला प्रकार उघड

Spread the love

उदयपूर / विशेष प्रतिनिधी 

                    एका आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर तिच्याच सहकाऱ्यांकडून कार मध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कार मध्ये असलेल्या डॅश कॅम मुळे या घटनेचे पुरावे जमा करण्यात महिलेला सुविधा झाली.आणि याच पुराव्याच्या आधारावर तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी कंपनीचा सीईओ जयेश, गौरव आणि शिल्पा या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

ही घटना 20 डिसेंबर 2025 च्या रात्री घडली असून या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी कारमधील डॅशकॅमचे फुटेज हा सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. आरोपींनी पीडितेला घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते, मात्र वाटेतच तिला गुंगीचे औषध देऊन कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

तपासातून समोर आलेली माहिती अशी की, एका हॉटेलमध्ये कंपनीच्या सीईओचा वाढदिवस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने पार्टी आयोजित करण्यात आली होती. रात्री 9 वाजता ही पार्टी सुरू झाली आणि ती मध्यरात्रीपर्यंत चालली. रात्री 1:30 च्या सुमारास पीडित तरुणीला घरी जावेसे वाटले, तेव्हा कंपनीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने तिला घरी सोडण्यासाठी कारमध्ये बसवले. या कारमध्ये सीईओ आणि महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती आधीच बसलेले होते. वाटेत गाडी एका दुकानाजवळ थांबवण्यात आली, जिथे तिला काहीतरी अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करण्यात आले.

पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, ती नशेत असताना आरोपींनी तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तिघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. रात्रभर हा संतापजनक प्रकार कारमध्येच सुरू होता. आरोपींनी पहाटे 5 वाजता पीडितेला तिच्या घराच्या परिसरात सोडून पळ काढला. जेव्हा पीडितेला शुद्ध आली, तेव्हा तिला आपल्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या. स्वतःला सावरल्यानंतर तिला कारमध्ये असलेल्या डॅशकॅमची आठवण झाली. तिने हिंमत करून त्या कॅमेऱ्यातील फुटेज तपासले असता, त्यात संपूर्ण घटनेचे आवाज आणि काही दृश्ये रेकॉर्ड झाली असल्याचे स्पष्ट झाले.

उदयपूर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता सामूहिक बलात्काराच्या गोष्टीला पुष्टी मिळाली. डॅशकॅममधील ऑडिओ आणि व्हिडिओ फुटेजमुळे आरोपींची सुटका होण्याचे सर्व मार्ग बंद झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर सबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close