राखेच्या खेळात अनेक बेचिराख
प्रतिनिधी बीड
मस्साजोगचे सरपंच यांचे अपहरण आणि हत्येमुळे बीड जिल्ह्याचे काळं सत्य समोर आले. बेकायदेशीर आर्थिक सत्ता मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यात दहशत माजवली जाते. वेळप्रसंगी मुडदे पाडले जातात.
परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील राखेचे सत्य समोर आले आहे.
बीड जिल्ह्यातील हवेतला गोळीबार… रिव्हॉल्व्हर घेऊन सोशल मीडियावर फोटो… कोयते चाकूसोबत व्हायरल केलेले फोटो… सर्व समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात जंगलराज सुरू आहे का असा प्रश्न समोर येतो. केवळ परस्पर विरोधी टोळीवर वचक बसवण्यासाठी सोशल मीडियावर धिंगाणा सुरू आहे आणि हे सगळे करण्यामागचे कारण अर्थकारण..शस्त्राच्या माध्यमातून धाक दहशत निर्माण करणे आणि बेकायदेशीर पैसा मिळवणे याची स्पर्धा बीड जिल्ह्यात सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील परळी शहर नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामुळे सर्वांना परिचित आहे. परळी शहरात असलेला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा ठरला आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी ही राख ही कोट्यवधीच्या घरात आहे. या प्रकल्पातून वर्षभरात बाहेर पडणारी राख अंदाजे एक हजार कोटींची आहे. विशेष म्हणजे ही राख उचलून नेण्यासाठी कोणतेही टेंडर निघत नाही की ठेका विकला जात नाही .
राख उचलून आर्थिक गब्बर
परळीची हजारो कोटींची राख फुकटात उचलून काही टोळ्या आर्थिक गब्बर झाल्यात. हजारो फुकटच्या राखेवर नियंत्रण आणि कब्जा राखण्यासाठी दहशतीचा खेळ सुरू झालाय. हातात शस्त्रे आणि महागड्या गाड्या..आपापल्या टोळींकडून स्थानिक नेत्यांना आर्थिक रसद जाते. त्याच्या बदल्यात स्थानिक नेता प्रशासनाला दाबून ठेवण्याचे काम करतात. आपल्या टोळीवर कारवाई करायची नाही असा दम देतात. एवढच नाही तर प्रसंगी अधिकाऱ्यांना उचलून नेऊन दहशद बसवली जाते.
पाच दशक या टोळ्यांचा हैदोस
औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटची राख उचलण्याची विविध टोळ्यांमध्ये स्पर्धा असते. त्यातूनच संघर्ष सुद्धा होतो. ही राख उचलण्यासाठी जवळपास सातशे ते आठशे हायव्हा दिवसरात्र काम करतात.हा धंदा 52 वर्षांपासून सुरू आहे . परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटच्या राखेवर वर्षानुवर्षे डल्ला दिवसाढवळ्या मारला जातो..आलेल्या या कोट्यवधींच्या फुकटच्या पैश्यावर मग मस्ती आणि मुजोरी केली जाते..प्रशासनाचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते मॅनेज झाल्याने गेले पाच दशक या टोळ्यांचा हैदोस सुरू आहे तो कधी थांबणार?आणि कोण थांबवणार हा सवाल आहे