आज महानिकाल ; आज ठरणार शिवसेना कोणाची ?
वर्षा बंगल्यावर रात्री एक तास चालली खलबत
मुंबई / विशेष प्रतिनिधी
मागील काही कालावधी पासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचावर आज तोडगा निघणार आहे.आज दुपारी 4 वा. शिवसेना कोणाची यावर आज निकाल येणार आहे. या निकालाकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. या निकालात आमदार अपात्रतेचा मुद्दा महत्वाचा असल्याने 16 आमदारांचे भविष्य ठरणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांकग्यात रात्री वर्षी बंगल्यावर खलबत झाल्याचे समजत आहे. या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.
त्याचबरोबर या बैठकीसाठी राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुल्का देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. तर या बैठकीमध्ये आज योणाऱ्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकालानंतर राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष होऊ नये, शांतता रहावी यासाठी काळजी घेतली जाणार आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून काही महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्याचीही माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज ४ वाजता या निकालाचं वाचन करणार आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत चर्चेच्या आणि राजकीय वादाच्या ठरलेल्या या मुद्द्यावरील निकालाकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचेही लक्ष लागले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात दोन्ही गटांच्या याचिकांवर १४ सप्टेंबर ते २० डिसेंबरपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मॅरेथॉन सुनावणी झाली होती. आज विधानसभा अध्यक्ष विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करणार आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामध्ये शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांचा समावेश आहे.