ट्रक आणि दुचाकी च्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू
नातेसंबंधातील होते तीन तरुण
गडचिरोली / नवप्रहार मीडिया
गडचिरोली – चंद्रपूर रस्त्यावर असलेल्या मुरखळा गावाजवळ दुचाकी आणि ट्रक दरम्यान झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तीनही तरुण एकमेकांच्या नातेसंबंधात होते.घटना रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडली आहे. अक्षय दसरथ पेंदाम (२३), अजित रघू सडमेक (२३), अमोल अशोक अर्का (२०) सर्व राहणार गोविंदगाव अशी मृत तरुणांची नावे आहेत
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अक्षय, अजित आणि अमोल नुकत्याच घेतलेल्या नव्या दुचाकीवरून भरधाव वेगाने गडचिरोलीच्या दिशेने येत होते. दरम्यान, मुरखळा गावाजवळच्या वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी धडकली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचे दोन तुकडे झाले. मृत तरुण अहेरी तालुक्यातील गोविंदगावचे रहिवासी होते. तसेच एकाच नातेसंबंधातील असल्याचे कळते.
घरातील तरुण मुलांच्या अपघाती निधनाने कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. यातील एकाचे वडील पोलीस विभागात कार्यरत आहेत. अपघाताची माहिती मिळताच रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. याप्रकरण गडचिरोली पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू केला आहे.