प्रहार शिक्षक संघटनेची जिल्हास्तर आढावा बैठक संपन्न

प्रश्न निकाली निघेपर्यंत शांत बसू नका – महेश ठाकरे
जिल्हा सचिव पदावर प्रमोद करणकार तर जिल्हा उपाध्यक्ष पदी रवींद्र सोळंके यांची नियुक्ती
योगेश मेहरे
अकोट
प्रहार शिक्षक संघटनेची अकोला जिल्हास्तरीय आढावा बैठक स्थानिक विश्रामगृह येथे माननीय राज्याध्यक्ष महेश ठाकरे विभागीय सचिव अमोल आगे अमरावती जिल्हाध्यक्ष शरद काळे , सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष मंगेश टिकार, नवनियुक्त जिल्हा सचिव प्रमोद करणकार,जिल्हा कार्याध्यक्ष अमर भागवत शिरीष जाधव अकोट तालुका अध्यक्ष गोपाल भोरखडे ,बार्शी टाकळी तालुकाध्यक्ष जयानंद इंगोले, तेल्हारा तालुकाध्यक्ष अमोल ढोकणे,अकोट तालुका सचिव मनोज महल्ले, रविंद्र सोळंके , मनोज दुधे,श्रीराम झटाले,मुंतजीर ,तथा जिल्ह्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
*जिल्हास्तरावर नवनियुक्त्या*
संघटनेचे कार्य गतिमान करण्यासाठी संघटनेमध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या पदाधिकाऱ्यांना यावेळी नवनियुक्त्या देण्यात आल्या. त्यामध्ये जिल्हा सचिव म्हणून प्रमोद करणकार जिल्हा उपाध्यक्ष म्हणून रवींद्र सोळंके जिल्हा संघटक म्हणून मनोज दुधे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
पदोन्नती,निवड श्रेणी तथा इतर प्रलंबित प्रश्न
प्रहार शिक्षक संघटनेमार्फत अमरावती आयुक्त कार्यालयावर जून महिन्यात आंदोलन करण्यात आले होते .त्यानुसार अकोल्या जिल्ह्यामार्फत दिलेल्या अनुपालन अहवालानुसार तात्काळ पदोन्नती करण्याचे लेखी आश्वासन अकोला जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले होते. परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही न झाल्याने यासंदर्भात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पदोन्नती प्रक्रिया तात्काळ मार्गी लागण्यासाठी संघटनेची पुढील दिशा ठरवण्यात आली. सोबतच निवड श्रेणीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यासंदर्भात माननीय महेश ठाकरे यांनी सूचना दिल्या.
सदर सभेमध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात तालुका निहाय आढावा घेण्यात आला. सोबतच संघटनेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात नियोजन करण्यात आले. अकोट तालुकाध्यक्ष गोपाल भोरखडे यांनी तसेच बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष जयानंद इंगोले यांनी त्यांच्या तालुक्याचा सविस्तर आढावा सभेमध्ये मांडला.
*विभाग स्तरीय खेळाडूंचा सत्कार*
यावेळी विभाग स्तरावर खेळ व क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या संघटनेच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विभाग स्तरावर अकोला जिल्ह्याच्या क्रिकेट संघाचे कर्णधार मुंतजीर सर यांनी अकोला जिल्ह्याला विजेतेपद मिळवून दिल्याबद्दल त्यांचा राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच सलग पाच वर्षांपासून विभागीय कबड्डी संघामध्ये सहभागी होणारे अकोट तालुका सचिव मनोज महल्ले , अकोट तालुक्याचे क्रीडा समन्वयक रवींद्र सोळंके, पातुर तालुक्यातर्फे झांकीचे उत्कृष्ट सादरीकरण करणारे शिरीष जाधव या पदाधिकाऱ्यांचा राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पी एम सारकिन्ही शाळेवर विद्यार्थ्यांच्या तालुका क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तालुकाध्यक्ष जयानंद इंगोले यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.
सदर आढावा बैठकीचे संचलन अमर भागवत प्रास्ताविक मंगेश टिकार आभार प्रदर्शन प्रमोद करणकार यांनी केले.यावेळी पदोन्नती प्रक्रिया तात्काळ मार्गी लावण्याचा निर्धार संघटनेमार्फत करण्यात आला. तसेच माननीय आयुक्त अमरावती यांनी निर्देश देऊनही जे प्रलंबित प्रश्न निकाली निघाले नाहीत त्याबाबत पाठपुरावा संघटनेमार्फत लवकरच करण्यात येणार आहे.