पोलीस कर्मचारीच अडकला लाचेच्या जाळ्यात

शमीम आकबानी
लाखनी (भंडारा)
लाखनी पोलीस ठाण्यातz कार्यरत पोलीस हवालदार राजेश नीलकंठराव गभने (वय 49) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीप्रकरणी कारवाई केली आहे. नागपूर येथील 52 वर्षीय तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने घराचा ताबा मिळवून देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता 5 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.
या घटनेतील तक्रारदाराने सण 2018 मध्ये लाखनी येथे घर खरेदी केले होते. (दि.17) एप्रिल रोजी एक महिला आणि तिच्या मुलाने त्या घराचे कुलूप तोडून ताबा घेतला. याबाबत तक्रारदाराने लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यावरून (दि.18) एप्रिल रोजी संबंधित महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यात सहकार्य करून घराचा ताबा मिळवून देण्याच्या बदल्यात आरोपी हवालदाराने तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पहिला हप्ता 5 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.
★लाचलुचपत विभागाची कारवाई
तक्रारदाराने (दि.22) एप्रिल रोजी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. (दि.23) एप्रिल रोजी पडताळणी कारवाईदरम्यान आरोपीने 5,000 रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार (दि.27) एप्रिल आणि (दि.14) मे रोजी सापळा कारवाईचे नियोजन करण्यात आले. मात्र, तक्रारदाराबाबत संशय आल्याने आरोपीने लाच रक्कम स्वीकारली नाही. तरीही, लाचलुचपत विभागाने आरोपी हवालदार राजेश गभने याला ताब्यात घेतले असून, लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आला असून, त्याच्या घरझडतीची कार्यवाही सुरू आहे. पुढील तपासासाठी निरीक्षणाची तजवीज ठेवण्यात आली आहे. या कारवाईसाठी सक्षम अधिकारी म्हणून भंडारा येथील पोलीस अधीक्षक यांची भूमिका आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम आणि अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सापळा कारवाई पथकात पोलीस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजरकर, पोलीस हवालदार मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, शिलपेंद्र मेश्राम, पोलीस नाईक अंकुश गाढवे, नरेंद्र लाखडे, पोलीस शिपाई विष्णू वरठी, चेतन पोटे, मयूर सिंगणजूडे, विवेक रणदिवे आणि चालक पोलीस शिपाई राहुल राऊत यांचा समावेश होता. पुढील तपास सुरू आहे.