पोलिसांनी मित्राची उलट तपासणी घेतल्यावर समोर आले हादरवणारे सत्य
दानापूर / नवप्रहार वृत्तसेवा
अभिषेक का मागील काही दिवसांपासून बेपत्ता होता. कुटुंबियांनि त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी देखील कसून शोध घेतला पण पत्ता लागला नाही. कुटुंबियांना अभिषेक चा मित्र असलेल्या अजित वर शंका होती. अजितला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची उलट तपासणी घेतली तेव्हा हादरवणारे सत्य समोर आले.
टीआयओ विक्रम सिहाग म्हणाले, परसा या गावातून अजितला ताब्यात घेऊन त्याची उलटतपासणी घेतली असता त्याने सगळी माहिती दिली. अभिषेक आणि अजित हे मित्र होते. अवघ्या नऊ हजार रुपयांच्या व्यवहारातून अजितने त्याची हत्या केली. यात त्यांच्या काही मित्रांनीही अजितला मदत केली. अभिषेक 11 जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याला सगळीकडे शोधलं जात होतं, मात्र त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. शेवटी कुटुंबियांनी या प्रकरणात पोलीस केस करायचं ठरवलं. ती करतानाच अभिषेक आणि अजित यांना शेवटचं एकत्र पाहिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे पोलिसांनी सगळ्यात आधी अजितलाच ताब्यात घेतलं. अभिषेकने आपल्याकडून नऊ हजार रुपये घेतले होते. अनेकदा मागूनही तो ते परत करत नव्हता. त्यामुळे अजितने सगळ्यात आधी आपल्या काही मित्रांना हाताशी धरुन अभिषेकला मारझोड केली. त्यानंतर गळा दाबून त्याचा जीव घेतला. त्याचा मृत्यू झालाय अशी खात्री पटल्यानंतर त्याच्याच कपड्यांनी मृतदेहाचे हातपाय बांधून इब्राहिमपूरच्या बागेत त्याला पुरुन टाकल्याची कबुली अजितने पोलिसांकडे दिली.
या प्रकरणात अजितने दाखवलेल्या ठिकाणी पोलिसांनी खोदकाम केलं असता पोलिसांना अभिषेकचा मृतदेह सापडला. या मृतदेहाची ओळख पटवून त्यानंतर पोलिसांनी तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. या हत्येप्रकरणी अजितला सहकार्य करणाऱ्या पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत असून, लवकरच उर्वरित आरोपीही पोलिसांच्या ताब्यात असतील असं सिहाग यांनी स्पष्ट केलं आहे.




