भागीदार तरुणाने केला तरुणाचा खून
दौड / नवप्रहार डेस्क
स्लाइडिंग विंडो बनविण्याच्या उद्योगात भागीदार असलेल्या तरुणा कडून भागीदार तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दौड तालुक्यात घडला आहे. हा खून गैरसमजुतीतून घडल्याचे बोलल्या जात आहे. अमोल साळुंके असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर महेश गणेश काळे (मूळ रा. अजनूज, ता. श्रीगोंदा, जि. नगर) असे आरोपीचे नाव आहे.
खून झाल्यानंतर वेगाने तपास करीत अवघ्या अठरा तासांच्या आत पोलिस पथकांनी मुख्य संशयित आरोपी महेश काळे याला ताब्यात घेतले.
पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या बारामती विभागाचे अपर अधीक्षक गणेश बिरादार यांनी या बाबत माहिती दिली. अमोल सुभाष साळुंखे (वय-३३, रा. लिंगाळी, ता. दौंड) याचा १० ऑक्टोबर रोजी रात्री लिंगाळी हद्दीत खून करण्यात आला होता.
स्लायडिंग काचेच्या खिडक्या व दारे आणि रंगकामाच्या व्यवसायात अमोल साळुंखे याचा महेश गणेश काळे (मूळ रा. अजनूज, ता. श्रीगोंदा, जि. नगर) हा मागील तीन वर्षापासून भागीदार होता. तीन वर्षात साधारणपणे चाळीस लाख रूपयांचा नफा एकत्रितपणे दोघांनी कमविला होता.
व्यवसाय वाढल्याने अमोल साळुंखे हा आपल्याला त्यामधून बाजूला काढण्याच्या प्रयत्नात असल्याचा गैरसमज करून घेत महेश याने त्याचा खून केला. निर्जन स्थळी मद्यपान केल्यानंतर महेश काळे याने अमोल याच्या डोक्यात दांडक्याने जोरदार वार केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
खुनाचा तपास पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांची पथके व दौंड पोलिसांची पथके, अशी एकूण सहा पथकांनी केला. दरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि सर्व संबंधितांकडे चौकशी केल्यानंतर महेश गणेश काळे (वय-३३, मूळ रा. अजनूज, ता. श्रीगोंदा, हल्ली रा. बोरावकेनगर, गोपाळवाडी, ता. दौंड) याने खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.
पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुढाकाराने दौंड पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत अवघ्या अठरा तासांच्या आत मुख्य संशयित आरोपीस ताब्यात घेतले. मृत अमोल साळुंखे यांच्या पत्नी तेजश्री साळुंखे यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. या खून प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता असल्याने पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.