बेपत्ता तरुणाचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला

पुणे / विशेष प्रतिनिधी .
25 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेल्या विराज ईश्वर फड (वय 18) रा. कोथरूड, पुणे याचा मृतदेह ताम्हिणी घाटातील देवकुंड व्ह्यू पॉईंट दरीत आढळला आहे. शनिवारी (ता. 30) रात्री आठच्या सुमारास रेस्क्यू टीम व पोलिसांनी अथक मेहनतीने या तरुणाचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढला
याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी (ता.25) विराज ईश्वर फड (वय 18) रा. कोथरूड, पुणे हा तरुण हरवल्याची तक्रार पुणे पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली होती. गुरुवारी (ता.28) ताम्हिणी घाट येथे असलेल्या देवकुंड व्ह्यू पॉईंट येथे काही पर्यटक आले असता त्यांना उंच कड्याच्या शेजारी एक बॅग आढळून आली. त्यामध्ये मोबाईल व कपडे होते. जवळच असलेल्या प्लस व्हॅली हॉटेल येथे त्यांनी ही माहिती दिली. माहिती मिळताच मुळशी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी महेश पवार यांनी त्या मोबाईलला चालू केले.
मोबाईल चालू केल्यानंतर बऱ्याच व्यक्तींचे फोन येण्यास सुरुवात झाली त्यानंतर समजले की तो मोबाईल हरवलेल्या विराज फड याच तरुणाचा आहे. त्यानंतर शोध कार्याला गती मिळाली महेश पवार व त्यांची टीम देवकुंड परिसरात शोध घेत होती. तर खालच्या बाजूने शेलार मामा रेस्क्यू टीम शोध घेत होती. शोधासाठी अधिक आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला.
यामध्ये पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टतर्फे (RESQ) ॲडव्हान्स ड्रोन आणण्यात आले. त्यामध्ये एका बाजूला त्या हरवलेल्या व्यक्तीची चप्पल दिसली. थोड्याच वेळात अधिक शोध घेण्यासाठी रोहा येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला व दीपक नायट्रेट लिमिटेड सदस्य यांना बोलवण्यात आले.
चप्पल असलेल्या जागेपासून खाली उतरण्यासाठी सर्व सुरक्षित उपकरणांचा वापर करून रेस्क्यू मेंबर त्या खोल दरीमध्ये उतरले. थोड्याच वेळात हरवलेल्या युवकाचा मृतदेह एका झाडाच्या खाली आढळून आला. स्ट्रेचर व रोपच्या साह्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला व पुढील तपासासाठी पुणे पोलीस दलाकडे सोपवण्यात आला.
यामध्ये सर्वच रेस्क्यू टीम ने सामूहिक रिकव्हरी ऑपरेशन करून अपेक्षित नसलेल्या वेळामध्ये बॉडी वरती आणण्यात यश मिळविले.