पांढरीतील प्रवेशद्वाराचा प्रश्न चिघळला
*जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज*
अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी)
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराचा प्रश्न निकाली न निघता अजूनही चिघळत चालला असून या घटनेनंतर जागी झालेल्या प्रशासनाने दोन्ही गटातील नागरिकांसोबत आज तब्बल सहा तास मॅरेथॉन बैठक घेऊनही कोणताच निर्णय न झाल्याने प्रवेशद्वाराचा प्रश्न राहून तसाच राहिल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे.
सविस्तर वृत्त असे की,पांढरी खानमपूर येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार हे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून लोखंडी प्रवेशद्वार काढून टाकावे कारण ते अवैद्य आहे असा गावातील एका गटाचा आरोप आहे तर दुसऱ्या गटाने आम्ही रितसर ठराव घेऊन प्रवेशद्वार उभारले असल्याने आम्ही ते काढू देत नाही असा पवित्रा उचलल्याने काल दिनांक २० ला दोन्ही गट आमने-सामने ठिय्या देऊन बसले आहेत.यातील एका गटाने आज दिनांक २१ ला शेकडो महिला पुरुषांसह पोलीस स्टेशन गाठून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून लावलेले अवैधरित्या लोखंडी कमान लावणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली.तर दुसरीकडे वृत्तपत्रात प्रशासनावर ताशेरे ओढल्यानंतर जागृत झालेल्या प्रशासनाने सकाळी ११ वाजता पासून ते दुपारी ५ वाजेपर्यंत तोडगा काढण्यासाठी दोन्ही गटाच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटपर्यंत यावर काहीही तोडगा निघू न शकल्याने आणि दोन्ही गट आपापल्या निर्णयावर ठाम असल्याने ५ वाजेपर्यंत चाललेली बैठक वांझोटीच झाली असल्याचे बोलल्या जात आहे. एकंदरीत पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वाराचा प्रश्न हा २६ जानेवारीपासून सुरू झाला असून आज एक महिना होत आला असताना त्यावर कोणताही तोडगा निघत नाही, याला स्थानिक प्रशासन आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता हेच कारणीभूत असून महसूल प्रशासना विषयी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वरवर जरी हा प्रश्न प्रवेशद्वाराचा वाटत असला तरी सदर प्रकरण चिघळतठेवण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करीत असल्याची चर्चा गाववासियांमध्ये असून संपूर्ण तालुक्यात धार्मिक वाद निर्माण करणाऱ्या त्या मास्टर माईंड चा शोध घेऊन त्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी पांढरी ग्रामवासियांमध्ये होत आहे.
चर्चेत समाधानकारक निर्णय अजून उद्यापर्यंत होऊ शकतो असे प्रशासनातील अधिकारी सांगत आहे.
प्रवेशद्वारा बाबत तोडगा काढण्यासाठी आज दिनांक २१ ला झालेल्या पंचायत समिती सभागृहात उपविभागीय अधिकारी ए.डी.हांडे,तहसीलदार पुष्पा सोळंके,उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत,ठाणेदार प्रकाश अहिरे,गटविकास अधिकारी विनोद खेडकर,विस्तार अधिकारी सुनील गवई आणि गावातील दोन्ही गटाचे नागरिक उपस्थित होते.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या गावाकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे.