पाणंद रस्त्याचे ग्रामीण मार्गात रुपांतर होणार!
• प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा पुढाकार
• ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागाची लवकरच बैठक
नागपूर /प्रतिनिधी
राज्यातील ग्रामीण भागांचा मुख्य केंद्रबिंदू व विकासाचा पाया असणारे पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतरीत करायची योजना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हाती घेतली जाणार आहे.
पाणंद रस्त्यांचा गाव शिवार ते शेत-शिवार पोहोच मार्ग व दळणवळणासाठी उपयोग होतो. प्रामुख्याने दोन गावातील सांधा म्हणूनही या रस्त्यांची ओळख आहे. शेती जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास व्हावा व शेतकऱ्यांना दळणवळणाची सोय व्हावी यासाठी पाणंद रस्त्याचे रुपांतर ग्रामीण मार्गात व्हावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती.
आता या मागणीला मूर्त रूप येणार आहे. या रस्त्यांना स्थानिक पातळीवर तसेच शासनाकडून मान्यताप्राप्त आहे. यामुळे या रस्त्यांचा विकास जलद गतीने व्हावा व त्यांचे बांधकाम होवून नागरिकांना त्यांचा अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी पुढाकार घेत पाणंद रस्त्याचे रुपांतर ग्रामीण मार्गात व्हावे याबाबतचे पत्र त्यांनी ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण याना लिहिले. याविषयावर लवकरच बैठक घेतली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
*रुपांतरित करण्याची कारणे*
• शेतकऱ्यांची तथा शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच शेतात उत्पादित शेतपिकाची ने-आण करण्याकरिता ग्रामीण भागात आवश्यक.
• राज्यात वारंवार होत असलेली अतिवृष्टीमुळे व वेळोवेळी दुरुस्ती न झाल्यामुळे हे पाणंद रस्ते पूर्णत: उद्धवस्त होऊन वाहतुकीकरिता व दळणवळणकरिता अडचणीचे झाले.
• रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने ग्रामीण भागात राज्याच्या मूलभूत व आवश्यक योजना गाव पातळीवर पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहे.
• मूलभूत सुविधा पोहचविण्याकरिता या पाणंद रस्त्यांचा विकास होण्याची गरज आहे, पाणंद रस्त्याचा विकास करण्याची मागणी राज्यातील विविध स्तरावरून व लोकप्रतिनिधींकडून मागणी आहे.