सामाजिक

पान पिंपळी- हीं बहुगुणीयुक्त औषधी वनस्पती

Spread the love

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे

महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील अमरावती,अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये 800 हेक्टर क्षेत्रामध्ये पिंपळीची लागवड केल्या जाते. या क्षेत्रातील अशा प्रकारची लागवड ही भारतातील एकमेव लागवड पद्धत आहे. भारतामध्ये महाराष्ट्रव्यतिरिक्त केरळ, आंध्रप्रदेश, आसाम, बंगाल, आसाम, उत्तराखंड व उत्तरांचल या राज्यात, हिमाचल प्रदेश व हिमालयाच्या पायथ्याशी देखील आढळते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘पायपर लॉगम’ असून ही पायपरेसी या कुळातील आहे. याचे फळ काळे असल्याने यास संस्कृत मध्ये ‘कृष्णा’, त्वरित कार्यकारी असल्याने ‘चपला’, तिखट असल्यामुळे ‘उषणा’, रुची उत्पन्न करणारी आहे म्हणून ‘कोला’, मगधातील असल्याने ‘मागधी’ या नावाने ओळखले जाते. सोबतच पिंप्पली ,वैदेही कणा, कटुबीजा, कोरंगी ,श्यामा, दंतफला, मगधोद्रभवा इत्यादी संस्कृत नावाने ओळखतात. हिंदीमध्ये हिला ‘पीपल’ तर इंग्रजीमध्ये ‘लॉग पेपर’ म्हणतात. या भागातील लोक या वनस्पती ला पानपिंपळी व लेंडीपिंपळी या नावाने ओळखतात.
ग्रंथातील उपलब्ध माहितीनुसार पिंपळीचे चार प्रकार सांगण्यात आले आहे ज्यामध्ये – पहिला प्रकार पिंपली- जिला मगध, विदेह व भारतीय प्रांतात होणारी आहे. दुसरी गजपिंपली -ज्यामध्ये एक संदीग्ध द्रव्य आहे. तिसरा सैहली- जी बाहेरील देशातून म्हणजेच श्रीलंका, सिंगापूर इत्यादी येणारी याला जहाजी पिंपळी देखील म्हणतात. चौथा प्रकार वनपिंपली- जंगलात आपोआप उगवणारी अशा प्रकारची बंगालमध्ये फार पिकते. ही बहुवर्षीय बेलवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीचा वेल जमिनीवर पसरतो त्यामुळे त्याला पांगरा किंवा हेटा या झाडाचा आधार दिला जातो. हिचे पान लांब नागवेलीच्या पानासारखी पाच ते नऊ शिरा असणारी चवीला किंचित तिखट असतात. याची फळे लांब असतात व पिकून सुकल्यानंतर काळे होतात. याची फळ लांब असल्याने या प्रजातीचे नाव ‘लॉगम म्हणजे लंबोडी असे देण्यात आले आहे. याची लागवड जानेवारी ते मार्च दरम्यान केल्या जाते व याला फळे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान येतात व त्याच दरम्यान या वनस्पतीच्या पिकाची काढणी केल्या जाते. या वनस्पतीचा चरक संहिता, सुश्रुत संहिता, आयुर्वेद व युनानी यामध्ये उपयोग दिला आहे. याची मूळ, खोड ,पाने व फळे यांचा उपयोग विविध रोगांवर केल्या जातो. पिंपळीच्या मूळाचा उपयोग भूक वाढवण्यासाठी, वेदना, दमा, प्लिहा रोगामध्ये केला जातो. मुळ्या उत्तेजक व रक्तवर्धक असतात. याच्या पक्व फळाचा उपयोग कफ ,दमा, वात ,खोकला, ताप ,प्रमेह, मूळव्याध, मेद रोग ,अपचन, मेंदूची अशक्तता, कावीळ, कुष्ठरोग या विकारासाठी केला जातो. श्वसनसंस्थेमध्ये अतिशय उपयुक्त असून याने कफ सुटतो. याचे चूर्ण मधात मिसळून घेतल्याने खोकला व दमा कमी होतो. रक्तवहसंस्थांमध्ये हिचे विशेष कार्य असून रक्तातील अग्नी वाढविणारी ,रक्तवर्धक व रक्तदृष्टीजन्य अनेक विकारांवर उपयोगी पडते.याच्या सेवनाने शुक्रदौर्बल्य नाहीसे होते. तसेच कष्टप्रसूती या विकारात उपयोगी पडते. स्त्रियांची कंबर दुखणे याकरिता पिंपळीचे चूर्ण गुणकारी आहे. याचा उपयोग अशक्तपणा, वेदनाशामक, एलर्जीविरोधी, ॲसिडीटी,अस्थमा, अतिसार, कॉलेरा मध्ये देखील केला जातो. मधुमेह विरोधी, लघवीचे प्रमाण वाढविणारी उच्च रक्तदाब प्रतिबंधक गुण पिंपळीमध्ये आहे. आयुर्वेदामध्ये त्रीकदु मधील महत्त्वाचा घटक म्हणून पिंपळीचा उपयोग आहे. पिंपळी हे नैसर्गिक फॅट बर्नर आहे. हिच्या पावडरचे एक-दोन चमचे मधासोबत सकाळी रिकाम्या पोटी आणि न्याहारीच्या ३० मिनिटे आधी सेवन केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळून मेदाचे शरीरातील नियमन हिच्या उपयोगाने होऊ शकते. चांगले पचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी एक चमचा या पावडरचे मधासह सेवन केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.
अशा या बहुगुणी वेलीच्या विविध भागांचा वापर आयुर्वेदिक औषधी बनविण्यासाठी देखील केल्या जातो. जसे पिंपळी काढा ,पिंपली यादीचूर्ण, पिंपळी रसायन, पिंपळी घ्रोतम, गुढपिंपळी.
या वनस्पतीच्या फळांमध्ये ‘पायपरीन’ व ‘पायपरलोग्युमीन’ हे महत्त्वाचे रसायन आहेत. या वनस्पतीची लागवड व रोपे तिच्या खोडांपासून तयार करतात.‌अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात अधिक प्रमाणात फार पूर्वीपासून एकमेव प्रकारची लागवड विशेषतः बारी समाजातील शेतकरी बांधव करत आहेत. पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यातील १०,००० शेतकरी कुटुंबाचे उपजीविकेचे साधन ही औषधी वनस्पती सध्याच्या परिस्थितीत बनली आहे. अशा औषधी वनस्पतीला संपूर्ण भारतात व विदेशात जागतिक दर्जाचे स्थान मिळावे व या परिसरातील शेतकऱ्यांना या वनस्पतीच्या उत्पादनाचा फायदा व्हावा या उद्देशाने या भागातील नागार्जुन आयुर्वेदिक औषधी वनस्पती फार्मर प्रोड्यूसर कंपनी अंजनगाव या संस्थेने पिंपळी पिकाला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया दिल्ली द्वारा गॅप सर्टिफिकेट मिळविले आहे व सध्या या वनस्पतीचे भौगोलिक मानांकनाचे काम देखील याच संस्थेच्या वतीने सुरू आहे. यासोबतच या वनस्पतीच्या लागवडीच्या प्रचाराकरिता कार्ड, श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील नागार्जुन औषधी वनस्पती केंद्र यांच्यात झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत कार्य करत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close