या कारणाने UPSC टॉपर ला घालवावे लागले 28 महीने तुरुंगात
यश मिळवणे जितके कठीण असते त्यापेक्षा कठीण असते त्या यशाची नशा डोक्यात न जाऊ देता त्या यशाला टिकऊन ठेवणे. पूजा सिंघल हे नाव देखील खूप चर्चेत आले होते. कारण त्यांनी वयाच्या अवधी 21 व्या वर्षी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ती टॉपर झाली. .
या कामगिरीची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्येही झाली. ती एकेकाळी UPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी एक उदाहरण होती, पण काळाने असं वळण घेतलं की तिचे नाव वादात अडकलं आणि ती तुरुंगात गेली. त्यानंतर ती अनेक महिने तुरुंगात होती. आता तिला जामीन मिळाला आहे, त्यामुळे तिचा बाहेर यायचा मार्ग मोकळा झाला आहे.
पूजा सिंघल असं या IAS अधिकाऱ्याचं नाव आहे. पूजा सिंघल या झारखंड कॅडरच्या IAS अधिकारी आहेत. झारखंडमधील मनरेगा घोटाळ्यात त्यांचं नाव समोर आल्याने ईडीने आधी त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आणि नंतर त्यांना अटकही झाली. गेल्या 28 महिन्यांपासून त्या तुरुंगात आहे. मनरेगा घोटाळ्याच्या रकमेचं मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पूजा सिंघल यांना 11 मे 2022 रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्या तुरुंगात आहेत. आता ईडी कोर्टाने पूजा सिंघल यांना तब्बल 28 महिन्यांनंतर जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने त्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दिले आहेत, त्यानंतर पूजा सिंघल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
कोण आहेत पूजा सिंघल?
निलंबित IAS पूजा सिंघल या मूळच्या उत्तराखंडमधल्या डेहराडूनच्या आहेत. पूजा सिंघल शालेय दिवसांपासून तिच्या अभ्यासात उत्कृष्ट होत्या. शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत त्या कायमच टॉपर असायच्या. सर्व परीक्षांमध्ये त्यांचे नाव टॉपर लिस्टमध्ये राहिले. पूजा सिंघल यांनी गढवाल विद्यापीठ डेहराडूनमधून पदवी प्राप्त केली, त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांची आयएएससाठी निवड झाली. प्रशिक्षणानंतर त्या 2000 च्या बॅचच्या IAS झाल्या. इतक्या लहान वयात UPSC सारखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या एकमेव उमेदवार होत्या, त्यामुळे त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं.
वादात सापडल्या पूजा सिंघल
IAS पूजा सिंघल यांनी विविध विभागांमध्ये अनेक पदे भूषवली आहेत. आयएएस झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग हजारीबाग, झारखंड येथे झाली. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2009 ते 14 जुलै 2010 पर्यंत त्या खुंटी जिल्ह्याच्या उपायुक्त होत्या. यावेळी त्यांच्यावर मनरेगा निधीतून 18 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला. त्या जेव्हा चत्राच्या उपायुक्त होत्या तेव्हा इथेही त्यांच्यावर असेच आरोप झाले होते. इथेही त्यांच्यावर मनरेगा निधीतील 4 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. पलामूमध्येही नियम शिथिल करून खाणींसाठी जमीन दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
2022 मध्ये ईडीचे छापे
6 मे 2022 रोजी ईडीने पूजा सिंघल यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. या काळात अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती, त्यानंतर ईडीने त्यांना 11 मे 2022 रोजी अटक केली. तेव्हापासून त्या तुरुंगात होती. आता ईडी कोर्टाने त्यांना जामीन देण्याचे आदेश दिले आहेत.