या कारणाने डॉक्टरची चमू पोहचली स्मशानभूमीत
पालांदूर (भंडारा )/ नवप्रहार डेस्क
सहसा डॉक्टरची चमू स्मशानभूमीत दिसत नाही. कुठला दफन केलेला मृतदेह पोलिसांनी त्यांना शंका आल्याने किंवा त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्याच्या फॉरेन्सिक नमुण्यासाठी मृतदेह काढून त्या ठिकाणी डॉक्टरांना बोलाविण्यात येते. पण भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदुर येथील स्मशान भूमीत डॉकटर ची चमू दाखल झाली होती. चला तर जाणून घेऊ काय आहे प्रकरण ?
माहितीनुसार, १४ सप्टेंबर म्हणजेच शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास लोहारा येथील अस्मिता मेश्राम (२९) या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी खराशी येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील लेबर रूममध्ये दाखल झाल्यानंतर उपचारादरम्यान अस्मिताचा मृत्यू झाला.
गर्भवती महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी महिलेच्या मृतदेहासोबत उजव्या बाजूला बाळ ठेवल्याचे सांगण्यात आले होते, असे नातेवाइकांचे म्हणणे होते. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास लोहारा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पार्थिव नेले असता बाळावर अंत्यसंस्कार करण्याकरिता पाहिले असता बाळ तिथे आढळले नाही. एकच गोंधळ उडाला. यावेळी शंका-कुशंकांचे पेव फुटले. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पालांदूर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला.
यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून मृत बाळ मातेच्या पोटात असल्याचे सांगण्यात आले; परंतु कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी आमच्या समक्ष पोटात बाळ आहे काय? हे दाखवण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील चमूने घटनास्थळी येत मृत गरोदर महिलेचे टाके काढत पोटातील बाळ दाखवले. बाळ आढळून आल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर मृत महिलेवर बाळासह अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, तोपर्यंत सात तासांचा कालावधी लोटला होता. मृत महिलेच्या मागे पती, मुलगा असा परिवार आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक दीपचंद सोयाम यांच्याशी भ्रमणधणीवर संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
“वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्मशानभूमीत दाखल झालो. सायंकाळी ४ वाजता जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिथेच टाके तोडीत पोटातील मृत बाळ नातेवाइकांना दाखविले. बाळ दिसताच वातावरण शांत झाले.”
-डॉ. प्रशांत फुलझले, ग्रामीण रुग्णालय, पालांदूर
“लोहारा येथील स्मशानभूमीत तणावपूर्ण स्थिती असल्याची माहिती मिळाली. लगेच कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला. वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. पालांदूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे.”
– विवेक सोनवणे, पोलिस निरीक्षक, पालांदूर