सोमैय्या यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

मुंबई / विशेष प्रतिनिधी
सोमैय्या हे काही न काही प्रकरण काढून चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बीएमसी मध्ये 900 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्ये 400 गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. हा जमीन घोटाळा दहिसर मध्ये झाल्याचे सोमैय्या यांचे म्हणणे आहे.
सोमय्यांच्या या आरोपामुळे भाजप आणि ठाकरे गटातील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी सोमय्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने दहिसरमधील 900 कोटींची जमीन एका बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षांपुर्वी निशल्प रिऍलिटीने दहिसर येथील 7 एकर जमिनीच्या खरेदीचा प्रस्ताव मांडला होता,पण तो स्वीकारला गेला नव्हता. या जागेवर 100 टक्के अतिक्रमणे आहेत.
महापालिकेचे त्यावेळचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महापालिकेच्या सुधार समितीला पत्राद्वारे जमिनीचा ताबा घेण्यास स्पष्ट विरोध केला. त्यानंतर महापालिकेच्या सुधार समितीने परदेशी यांच्याकडे या भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मांडला, पण परदेशी यांनी तो फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर निशल्प रिऍलिटीने मांडलेला हा प्रस्ताव अव्यवहार्य असून तो फेटाळणे का आवश्यक आहे, यावरही सविस्तर टिप्पण्णी दिली होती.
मुंबई महानगरपालिकेने 10 वर्षे या जमिनीच्या खरेदीचा प्रस्ताव फेटाळून लावला. या जमिनीची किंमत १५ कोटी रुपयेदेखील नाही. पण सत्तेवर येताच ठाकरे सरकारने 354 कोटी रुपये रोख रक्कम देऊन हा भूखंड खरेदी करण्यात आला. आता बिल्डर पुन्हा साडेपाचशे कोटी रुपये मागतोय, असा 900 कोटी रुपयांचा घोटाळा ठाकरे सरकारने केल्याचा आरोप, किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
या भूखंडाची किंमत 54 कोटीच्या आसपास असल्याचे परदेशी यांनी सांगितलं होतं. तसेच सूचनापत्रकात, कोणत्याही अडचणीविना अशा कोणत्याही जागेचा ताबा मिळाला पाहिजे, असे मत नोंदविले होते.शिवाय या भूखंड खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेल्या 354 कोटी रुपयांवरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अस असतानाही ठाकरे सरकारकडून महापालिकेच्या वित्त विभागाला या भूखंडाच्या खरेदीसाठी 349 कोटी, 14 लाख 19 हजार 13 रुपये इतकी रक्कम तातडीने देण्याची सूचना दिली.बिल्डरला अनामत रक्कम म्हणून 54 कोटी रुपयांचा अगोदरच देण्यात आले होते. त्यानंतर 294 कोटी रुपयांचा मोबदला निशल्प रिऍलिटीला देण्यात आला. आता तो पुन्हा 550 कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप सोमैय्यांनी केला आहे.