राष्ट्रवादीची खरी ताकद अजित पवार गटाकडेच

मुंबई / नवप्रहार वृत्तसेवा
अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागल्या गेली आहे. अजित दादा सोबत असलेले आमदार हे तरुण असल्याने आणि शरद पवार यांच्या सोबत फक्त मोठे नेते असल्याने खरी ताकद ही अजित पवार यांच्याकडे असल्याचे बोलल्या जात आहे.
ज्यांचा प्रभाव शिल्लक आहे त्यातील बहुतेक जण सध्या अजित पवार यांच्याकडे गेले आहेत. तर जुनी जाणती मंडळी ही शरद पवार यांच्यासोबत आहेत. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामुख्याने अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल, धर्मरावबाबा आत्राम, मनोहर नाईक, सुरेश देशमुख, हर्षवर्धन देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संतोषकुमार कोरपे, सुभाष ठाकरे, शिरीष धोत्रे, रमेश बंग आदी नेत्यांची नावे घेतली जात होती.
त्यानंतर गुलाबराव गावंडे, तुकाराम बिडकर, डॉ. आशा मिरगे, रेखाताई खेडेकर, संजय खोडके, घुईखेडकर यांची नावे घेतली जातात. तसेच नव्या दमाचे अनेक नेतेही तयार झाले होते. या सर्वांपैकी राजकारणात अजूनही प्रभाव राखून असलेल्या नेत्यांनी अजित पवारांचा गट जवळ केला आहे.
विदर्भात भाजपची पकड मजबूत आहे. लोकसभेच्या दहा जागांपैकी चंद्रपुरातून काँग्रेसचे एकमेव उमेदवार बाळू धानोरकर विजयी झाले होते. परंतु, त्यांचे नुकतेच अकाली निधन झाले आहे. उर्वरित पाच जागांवर भाजपचे तर तीन जागांवर सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार आहेत.
अमरावतीची जागा भाजपच्या जवळ गेलेल्या नवनीत राणा यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर प्रफुल्ल पटेल हे दावा सांगू शकतात. येथे भाजपचे सुनील मेंढे हे खासदार आहेत.
मित्र पक्षाची ताकद कमी करण्याचे धोरण
विदर्भात भाजप हाच एकमेव प्रभावी पक्ष राहावा यासाठी नेत्यांचा प्रयत्नात असतो. युतीतील पक्षाला त्याचा प्रभाव असलेल्या भागातील अधिकच्या जागा देऊन विदर्भातून हद्दपार करण्याचे भाजपचे धोरण आहे. यापूर्वीही शिवसेनेसोबत युतीत असताना विदर्भातून शिवसेनेची ताकद कमी करण्याचे काम भाजपने केले.
आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही तोच नियम लावला जाणार असल्याचे बोलले जाते. विधानसभेत ‘राष्ट्रवादी’चे सध्या सहा आमदार आहेत. त्यापैकी अनिल देशमुख सोडले तर सर्वच आमदार अजित पवार गटात गेले आहेत. विधानसभेतही विदर्भातून राष्ट्रवादीच्या वाट्याला यापेक्षा एखादं-दोन जागा अधिक मिळू शकतील. प्रामुख्याने शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट व काँग्रेसला डॅमेज करण्यासाठीच अजित पवार गटाचा वापर होण्याची दाट शक्यता आहे.
काटोलचे अनिल देशमुख हे एकमेव आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. अमरावतीतील राष्ट्रवादीचे संजय खोडके, सुरेखा ठाकरे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे येथे अजित पवार गटाचेच वर्चस्व दिसते. सहकार क्षेत्रातील डॉ. संतोषकुमार कोरपे, हर्षवर्धन देशमुख, रमेश बंग, गुलाबराव गावंडे, डॉ. आशा मिरगे हे शरद पवार यांच्या गटात आहेत. सध्या पदावर असलेल्यांपैकी बहुतेक जण अजित पवार यांच्याकडे गेले आहेत.