ती अचानक येऊन धडकली अन नवऱ्याचे पितळ उघडे पडले

नोएडा / नवप्रहार मीडिया
मागील काही काळात विवाहबाह्य संबंधात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. अश्या प्रकरणात अडकलेले लोकं कुटुंबाकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते. असेच एक प्रकरण नोएडा मधून समोर येत आहे. येथे एका खाजगी विद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत व्यक्ती नोकरीतून सुट्टी मिळत नसल्याचे सांगून घरी येत नव्हता. एक वर्ष हा प्रकार सुरू असल्याने पत्नीला शंका आली आणि तिने नवऱ्याच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली तेव्हा भलतेच प्रकरण समोर आले.
उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडामध्ये एका खासगी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तीला पहिल्या पत्नीला फसवून केलेला दुसरा विवाह चांगलाच महागात पडला आहे. 2020मध्ये खुर्जा परिसरात राहणाऱ्या एका महिलेशी या प्राध्यापकाचा विवाह झाला होता. त्यांना एक मूलही आहे. बुलंदशहरमध्ये त्याचं घर असून, तिथं त्याची पहिली पत्नी आपल्या मुलासह राहते.
दोघांच्या संसारात सगळं सुरळीत सुरू होतं; मात्र त्या प्राध्यापकाने गेल्या काही दिवसांपासून बुलंदशहरच्या आपल्या घरी येणं बंद केलं होतं. ‘कामातून सुट्टी मिळत नाहीये, त्यामुळे घरी येऊ शकत नाही,’ असं हा सांगत राहिला. वर्षभर पत्नीला फारशी शंका आली नाही. तिला वाटलं आपल्या पतीला कामातून खरंच सुट्टी मिळत नसेल; मात्र सतत सुट्टी न मिळण्याचं कारण ऐकून नंतर तिला त्याच्याबद्दल शंका येऊ लागली. हा प्राध्यापक आपल्या पहिल्या पत्नीशी वर्षभर खोटं बोलत राहिला आणि त्याने दुसरा संसारही थाटला होता.
पती घरी न येण्याचं नेमकं प्रकरण काय आहे ते प्रत्यक्ष बघण्यासाठी तिनं आपल्या नातेवाईकांसह त्याचा शोध सुरू केला; मात्र तो वारंवार त्याचं घर बदलत होता. मागच्या बुधवारी अखेर त्याची पहिली पत्नी आपल्या बहिणीसह आणि नातेवाईकांसह त्याच्या नव्या पत्त्यावर थडकली. तेव्हा त्याच्या दुसऱ्या लग्नाचं पितळ उघडं पडलं. पहिल्या पत्नीने आणि तिच्या बहिणीनं मिळून त्याची अक्षरशः धुलाई केली. अन्य नातेवाईकही जमा झालेच होते.
पोलिसांनी प्राध्यापकाला घेतलं ताब्यात
घरात सगळा मारहाणीचा गोंधळ सुरू असतानाच पतीने त्याला पहिल्या पत्नीबरोबर राहण्याची इच्छा नाही हे सांगून टाकलं. शेवटी प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तेव्हा पहिल्या पत्नीने प्राध्यापकावर फसवणुकीचा आरोप करून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सध्या प्राध्यापकाला अटक केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.