सत्ता स्थापनेचा नविन फॉर्म्युला सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

मुंबई / नवप्रहार डेस्क
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देखील अद्याप मुख्यमंत्री पदाच्या नावावर एकमत न झाल्याने राज्यात सत्ता स्थापनेसाठी विलंब होतोय. पण आता सोशल मीडियावर सत्ता स्थापनेचा नवीन फॉर्म्युला तुफान व्हायरल होत आहे चला तर जाणून घेऊ या नवीन फॉर्म्युला नेमकं कुठला आहे.
निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सत्ताधारी होण्याचं स्वप्न भंगलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी महायुतीच्या फॉर्म्युल्यावर आधारित शपथविधी सोहळा झालेला नाही. याचदरम्यान, सोशल मीडियावर एका राजकीय फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने २३० जागा जिंकल्या. यात भाजपने १३२ जागा जिंकल्या. तर शिंदे गटाने ५७ जागा आणि अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या आहेत. तसेच निवडणुकीनंतर काही अपक्ष आमदारांचीही साथ महायुतीला मिळाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने फक्त १६ जागा जिंकल्या आहेत. तर ठाकरे गटाने २० जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने केवळ १० जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या समाजवादी पक्षाला २ जागांवर मजल मारता आली. या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचं पारडं जड झालं आहे.
महायुतीने२३० जागा जिंकल्याने सत्ता स्थापनेसाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. महायुतीत भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर आधी आग्रही असलेल्या शिंदे गटाने मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याची चर्चा आहे. महायुतीच्या सत्तावाटपात अजित पवार गटाला अर्थमंत्रिपद देण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला नगर विकास खाते मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गृहमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे महायुतीत सत्तावाटपाचा पेच निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. सत्तावाटपात पदरी दुय्यम खाती पदरी पडत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. मात्र, दुसरीकडे नाराजीच्या चर्चा सुरु असताना महायुतीच्या शपथविधीची तारीख देखील समोर आली आहे.
महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार असल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, महायुतीत मुख्यमंत्री कोण आणि सत्तावाटप कसं झालं, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे नाराजी कशी दूर केली, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
महायुतीच्या सत्तावाटपाच्या चर्चेदरम्यान सोशल मीडियावर महाविकास आघाडीशी संबंधित एका फॉम्युल्याची जोरदार चर्चा होत आहे. मागील निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. या नव्या फॉर्म्युल्याला महाविकास आघाडी नाव देण्यात आलं होतं. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरे यांना मिळालं होतं. मात्र, अवघ्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी कोसळलं. त्यानंतर शिवसेना फुटली आणि भाजप सत्तेवर आल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या रुपाने राज्यात आगळीवेगळी आघाडी पाहायला मिळाली होती.
आताही अशाच एका आघाडीचा फॉर्म्युला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आघाडीत शिंदे गट, काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचा समावेश आहे. ५७+४१+१०+२०+१६+४ = १४८ असा फॉर्म्युला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावरील व्हायरल फॉर्म्युल्यानुसार भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीतील नेत्याला मुख्यमंत्री होण्याची संधी असल्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील राजकारणात या फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापित होणार नाही. या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फॉर्म्युल्यात तसं काहीच तथ्य नाही. हा फॉर्म्युला प्रतक्षात खरा उतरणारा नाही. मात्र, राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे देखील विसरून चालता येत नाही.