पाणीबाणी – नळ आहेत पण पाणी नाही वेशिवरच्या गावावर पाणि टंचाई च्या झळा
वर्धा / आशिष इझनकर
वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याच्या अगदी वेशीवर असणारे पोथरा नदीजवळील चीचघाट हे गाव अजूनही तहानलेले आहे. गावात विहीर आणि हँडपम्प असतानाही पाणीटंचाई कशी? असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. पण क्षारयुक्त पाण्यामुळे त्रस्त गावकरी लांबून पाणी आणणे पसंत करतात. हर घर नल म्हणत योजनेतून प्रत्येकाच्या घरी नळ पोहचले. पण पाणी पोहचले नाही, ही खंत गावकऱ्यांची आहे.
हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह या ग्राम पंचायत अंतर्गत येणारे चिकमोह हे गाव वर्धा जिल्ह्याच्या शेवटी सीमेवर आहे. पोथरा नदीच्या लगत असणाऱ्या या गावात दोन विहिरी आणि तीन हातपंप आहे. विहीर आणि हातपंप या स्रोताला पाणी उपलब्ध आहे. पण हे पाणी क्षारयुक्त असल्याने आरोग्याच्या तक्रारी नियमित असतात. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी हे पाणी पिण्यासाठी वापरण्याचे टाळले. बऱ्याचदा नदीचे पाणी देखील गावात आणले गेले. अखेर 2022 मध्ये जलजीवन मिशन या योजने अंतर्गत येथे 37 लक्ष 70 हजार 32 रुपये निधी मंजूर होत पाण्याची टाकी, विहीर आणि पाईपलाईन ही कामे प्रस्तावित झाली. कामाला मंजुरी मिळाली त्याचा कार्यारंभ आदेश देखील निघाला. नदीच्या काठावर पाणीपुरवठा अभियंते आणि कंत्राटदार यांच्याकडून विहीर खोदून तेथे विहीर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण लाल माती लागल्याने विहिरीचे काम बंद करण्यात आले. लाल माती लागल्याने विहिरीचे काम बंद पडावे हे कारण मात्र गावकऱ्यांच्या मनाला पटले नाही. याच विहिरीच्या जागेलगत नदीच्या दुसऱ्या काठावर चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. तेथे त्या जिल्ह्यातील एका गावासाठी विहीर खोदण्यात आली आणि ती लाल माती लागली असतानाही बांधण्यात आली. आमच्या गावाला ही लाल माती का आडवी आली? असा सवाल येथील राहूल भोयर यांनी उपस्थित केला.
अखेर पाण्याचा महत्वाचा स्रोत असलेल्या विहिरीचे बांधकाम झालेच नाही. त्याऐवजी गावात बोरवेल घेण्यात आली. बोरवेल देखील केवळ सत्तर फूट खोल करण्यात आली. त्यातही ही बोअरवेल दुर्लक्ष झाल्याने काही फूट बुजली. आता बोरवेलला पाणी आहे. काही महिन्यांपूर्वी गावात घरोघरी नळ असावे यासाठी नळ देखील घरोघरी लावण्यात आले. पाईपलाईन टाकण्यात आली, ही पाईपलाईन किती टिकाऊ आहे असे म्हणत येथिल गावकरी वर्षा मडावी, सुमनबाई फलके, मधुकर फलके, चिंगाबाई किन्नके, सुमन रत्नाकर कवडे, हे गुणवत्तेवर बोलले. पाण्याच्या टाकीचा अजूनही गावात पत्ताच नाही. टाकीसाठी जागेची निवड करण्यात आली पण टाकीला अजून सुरुवात झाली नाही, मग दोन वर्षात कंत्राटदाराने नेमके केले तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मे महिन्यातील उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. पाणी टंचाईच्या झडा बसायला लागल्या, पण येथील पाणी टंचाई काही वेगळीच आहे. गावात पाणी आहे पण पिण्यायोग्य नाही. गावाबाहेर दोन किमीवर असलेला हातपंप यासाठी कामी पडतो आहे. गावकरी पायपीट करीत या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हात पंपावरून पाणी आणतात. याच ठिकाणी बोअरवेल करण्यात आले आहे, पण नियमानुसार वीजपुरवठा अजून केला गेला नाही, गावकऱ्यांनी तात्पुरती उपाययोजना म्हणून वायर जोडत बोरवेल सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या हिंगणघाट तालुक्यातील चीचघाट या गावच्या नळयोजनेची अशी अशी अवस्था का झाली? याचे कारण शोधायला यंत्रणेकडे वेळ नाही. विहीर नाही, पाण्याची टाकीही नाही मग 37 लक्ष रुपयांच्या या योजनेवर पाण्यासारखा केलेला खर्च कागदावरच राहिला का? स्रोत जवळ असतानाही घशाला कोरड असणाऱ्या या गावकऱ्यांनी आता उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे.
जल जीवन मिशन च्या योजनेत या गावातील पाणीपुरवठा का रेंगाळला याबाबत जाणून घेण्यासाठी अभियंता संजय झोटिंग यांच्याकडून जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.