मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 13314 मतदार; 26 मतदान केंद्र
145 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती
(राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन)
भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 3442 – पुरुष मतदार, 9872 – महिला मतदार, असे एकूण 13314 – मतदार आहेत. मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी सहा. मतदान केंद्रासह 26- मतदान केंद्र आहेत.
मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी 29 – मतदान केंद्राध्यक्ष, 29- प्रथम मतदान अधिकारी (PRO), 58 – इतर मतदान अधिकारी, 29 – शिपाई असे एकूण 145 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई शिक्षक मतदार संघाचे गेली अठरा वर्षे आमदार कपिल पाटील यांनी नेतृत्व केले आहे. शिक्षकांचे निवृत्ती वय 58 असल्याने मी शिक्षक मतदार संघातून निवृत्ती स्वीकारत आहे अशी घोषणा आमदार कपिल पाटील यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत केली. परंतु मी राजकारणात सक्रिय राहणार आहे अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शिक्षक भारतीचे तरुण उमेदवार सुभाष मोरे यांना शिक्षक भारती तर्फे उमेदवारी देण्यात आली आहे व त्यांचा विजयही निश्चित आहे असा आत्मविश्वास कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिक्षक सेनेचे ज. मो. अभ्यंकर हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवनाथ दराडे यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणी शिवाजी शेंडगे यांना शिवसेनेच्या वतीने पुरस्कृत करुन महायुतीमध्येच आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी तर्फे शिवाजी नलावडे यांनी अर्ज दाखल केला आहे.महायुती व महाविकास आघाडी मध्ये विधान परिषद निवडणुकीत संघर्ष पहावयास मिळतो आहे या संदर्भात शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या मते गेली तीन टर्म म्हणजे गेली अठरा वर्षे मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो आहे. आमच्या महाविकास आघाडीचे कुटुंब प्रमुख म्हणून सन्मानीय उध्दव साहेब ठाकरे यांच्याकडे या विषयावर माझी चर्चा झाली आहे मी माझ्या मतदारसंघात पुर्ण ताकदीने उतरणार असल्याचे सांगितले व माझे उमेदवार सुभाष मोरेच असतील याची कल्पना उध्दव साहेब ठाकरे यांना दिली आहे. मी युतीचा धर्म पाळला आहे असे मत व्यक्त केले. नुकत्याच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत विधान सभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्धीर व्यक्त केला आहे परंतु या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मंडळी अनुपस्थीत होते याचे कारण म्हणजे 26 जुनला होणाऱ्या विधानपरिषदचा नेत्यांनी घातलेला घोळ अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात होत आहे.विधान परीषद निवडणुकीनंतर आँक्टोंबर मध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील तो पर्यंत राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असेल. आयाराम व गयाराम नेत्यांची वर्णी कुठे लागेल हे लवकरच कळेल!