मुलांची तस्करी करणारे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती ; पाच लोकांना अटक
भुसावळ / मनमाड / नवप्रहार न्यूज नेटवर्क
रेल्वे सुरक्षा दलाने भुसावळ येथे 29 तर मनमाड येथे 30 लहान मुलांना आणि पाच संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे. मदरश्यात शिक्षण देण्याच्या नावावर या मुलांची तस्करी केली जात असावी असा पोलिसांना संशय आहे. या मुलांना बिहार मधील अररिया येथून सांगली ( महाराष्ट्र) येथे नेण्यात येत होते असे समजले आहे . या मूलांना दानापूर – पुणे एक्सप्रेस ने नेण्यात येत होते.
बिहारमधील (Bihar) अररिया जिल्ह्यातील मुलांची तस्करी होत आहे. या मुलांना मदरशाच्या वेशात दानापूर-पुणे एक्सप्रेसमधून नेले जात असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने दिली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाईला केली. भुसावळ स्थानकावर आल्यानंतर दानापूर एक्सप्रेसची कसून तपासणी केली. धावत्या गाडीतील वेगवेगळ्या डब्यांमधून 8 ते 15 वयोगटातील 29 लहान मुले आढळली. पथकाने त्यांना जळगाव स्थानकावर ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरविले. या कारवाईत मोहम्मद अंजर आलम (वय 34) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतरही आणखी मुलांची तस्करी होत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर भुसावळहून मनमाडकडे जाणाऱ्या दानापूर-पुणे एक्सप्रेसची पुन्हा तपासणी केली. त्यावेळी काही मुले संशयित असल्याचे आढळले. त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी पुण्याहून सांगलीला जाणार असल्याचे सांगितले. मुलांचे आधारकार्ड, ओळखपत्रे मागितले. मात्र ते त्यांच्याकडे नव्हते.
या पथकाने 30 लहान मुलांना ताब्यात घेतले. तर सद्दाम हुसेन सिद्दकी (वय 23), नौमान सिद्दकी (वय 28), एजाज सिद्दकी (वय 40), मोहम्मद शहा नवाज (22) यांना मनमान रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. हे सर्व तस्कर अररिया जिल्ह्यातील रहवासी आहेत. एका संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि चार संशयित तस्करांविरुद्ध मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी सर्व मुलांकडे विचारपूस केली. त्यावेळी या मुलांची मदरशातील शिक्षणाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली. पालकांचे कुठलेही संमतीपत्र त्यांच्याकडे नव्हते. किंवा कोणत्या शाळेत, मदरशात दाखल करणार याचीही माहिती त्यांच्याकडे नव्हती. ताब्यात घेतलेल्या मुलांजवळ ओळखीची कुठलेही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्या पालकांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
सुटका केलेल्या मुलांची पोलिसांनी तत्काळ खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्या 59 मुलांपैकी 29 मुलांना जळगाव आणि 30 मुलांना नाशिक येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. यातील चार व्यक्तींना मनमाड लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना चांदवड न्यायालयापुढे हजर केले. त्यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भुसावळचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राधाकिसन मीना, लोहमार्ग पोलीस निरीक्षक विजय गेराडे आणि मनमाड रेल्वे सुरक्षा बलाचे संदीप देसवाल, लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आधी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी व लोहमार्ग पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.