सफाई अभियान राबविणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला दिसला तो फलक अन..…
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
शहरात सफाई साठी गेलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्याला समोर एक फलक ( बोर्ड) दिसला. त्यावरील नाव वाचुन त्यांना शंका आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता समोरच्या व्यक्तीने त्यांना पाहून दार बंद करून घेतला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले.
टीना डाबी यांनी ‘नवो बारमेर’ अर्थात न्यू बारमेर हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत नव्या युगातील तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. चामुंडा चौकाजवळ आज सकाळी टीना डाबी आपल्या टीमसोबत शहरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी करत होत्या. यावेळी त्यांची नजर स्पा सेंटरकडे गेली. स्पा सेंटरच्या चालकाने टीना डाबी यांना पाहताच आतून दरवाजा बंद केला. त्यामुळे टीना डाबी यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने अतिरिक्त जिल्हाधिकारी, एसडीएम आणि यूआयटी सचिवांना पाचारण केले.
स्पा सेंटरचा दरवाजा तोडून आत गेल्यावर स्पा सेंटरच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चार मुली आणि दोन तरुण आढळून आले. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्वांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात नेले. वेश्याव्यवसायाच्या संशयावरून पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, बाडमेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली अनेक दिवसांपासून अनैतिक कृत्ये सुरू असून पोलिसांच्या संगनमताने या कारवायांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या केंद्रांवर कारवाई करण्याची मागणी लोकांनी अनेकदा प्रशासनाकडे केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, टीना डीबी यांची नुकतीच राजस्थानमधील बारमेर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस टॉपर टीना दाबी या त्यांच्या नियुक्तीपासून ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. कधी त्या स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून रस्त्यावर झाडू मारताना दिसतात, तर कधी रुग्णालयात अचानक धाड मारत निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांना फटकारताना दिसते. टीना डाबी यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. त्यामुळे बाडमेरच्या जनतेलाही टीना डीबी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.