मोसाद सारखी गुप्तहेर संघटना असतांना देखील बाहुबली इस्त्रायल ची हमास ने कशी केली दुर्दशा
‘ मोसाद ‘ बद्दल सिर्फ नाम ही काफी है असंच म्हणायचे पण पॅलेस्टाईन समर्थीत ‘हमास ,’ संघटनेने इस्त्रायल ची 7 ऑक्टोबर 2023 रोजी जी दुर्गती केली त्यानंतर एक साधी मुंगी देखील हत्तीवर भारी पडू शकते हेच दिसून आले आहे. कारण मोसाद संघटनेने जगभर केलेल्या कारवाया त्यांच्या बद्दल सांगण्यास पुरेश्या आहेत. यात इस्त्रायल ला त्यांनी केलेल्यांचार चुका भोवल्याचे बोलल्या जात आहे त्या चुका काय आहेत यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. पण छोटीशी चूक देखील किती महागात पडते हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात इस्त्रायलच्या लष्कराची अक्षरशः दाणादाण उडालेली जगाने पाहिले. या हल्ल्याने इस्रायलचे लष्कर आणि गुप्तचर संघटनांची लक्तरे वेशीला टांगली गेली. इस्त्रायलपासून अगदी 40 किमी अंतरावर त्या देशाविरुद्ध एवढ्या मोठ्या आणि भीषण हल्ल्याची योजना आखली जातेय, याची साधी कुणकुण इस्त्रायलच्या गुप्तहेरांना लागू नये, यावर सुरूवातीला अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. ‘हमास’सारखी एक छोटीशी अतिरेकी संघटना इस्त्रायलविरोधात भीषण हल्ल्याची योजना आखत असताना इस्त्रायलचे गुप्तहेर आणि लष्करी अधिकारी काय करत होते, हा प्रश्न विचारला जातोय. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ मध्ये प्रकाशित एका ताज्या लेखातून इस्त्रायचे लष्कर आणि गुप्तहेर अपयशी ठरण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या लेखानुसार इस्त्रायलवर हल्ला झाला त्याच दिवशी, शनिवारी पहाटे गाझा पट्टीमध्ये ‘हमास’ अतिरेक्यांची काहीतरी चलबिचल सुरू असल्याचा अंदाज इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेने लष्कराकडे धाडला होता. परंतु गुप्तचरांचा तो संदेश सीमेवर तैनात लष्करी जवानांपर्यंत पोचण्या आधीच हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायली लष्कर आणि गुप्तचरांदरम्यानची संदेशवहन यंत्रणा आणि वॉच टॉवरवरील कॅमेरे ड्रोन पाठवून निकामी करून टाकले होते. सीमेवर गाझा पट्टीच्या दिशेने रिमोट कंट्रोलद्वारे संचालित करता येणाऱ्या मशीन गन्स लावून ठेवण्यात आल्या होत्या. त्याही ड्रोनद्वारे उध्वस्त करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. सिग्नल यंत्रणा, कॅमेरे उध्वस्त झाल्यामुळे ‘हमास’च्या अतिरेक्यांनी इस्रायलद्वारे सीमेवर उभारण्यात आलेल्या तारेच्या कुंपणावर बिनबोभाट बुलडोझर टाकून दक्षिण इस्त्रायलच्या तब्बल ३० गावांमध्ये बिनदिक्कतपणे प्रवेश मिळवला आला असं मत इस्त्रायच्या चार वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘न्यूयॉर्क टाइम्सला’ सांगितलं आहे.
इस्त्रायची शहरे आणि लष्करी तळांवर गेल्या ५० वर्षातला हा सर्वात भीषण हल्ला मानला जातो. ‘हमास’सारख्या कमकुवत मानल्या गेलेल्या शत्रू गटाने केलेल्या अचानक हल्ल्यापुढं इस्त्रायलचं लष्कर शनिवारी सकाळी अक्षरशः गांगरून गेल्याचं सुरुवातीचं चित्र होतं, असं न्यू यॉर्क टाइम्सच्या लेखात म्हटलं आहे. परिणामी शनिवारी दिवसभर इस्त्रायलची अनेक गावं ‘हमास’ अतिरेक्यांच्या ताब्यातच राहिली होती.
इस्त्रायलची गुप्तचर संघटना आणि लष्कराकडून खालील चार मोठ्या चुका घडल्याने ‘हमास’ अतिरेक्यांना भीषण हल्ला करणे शक्य झाल्याचा प्राथमिक अंदाज इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वार्ताहरांना सांगितलं आहे. या चुका म्हणजेः
१) ‘हमास’चे अतिरेकी आपसांमध्ये संवाद साधण्यासाठी वापरत असलेली साधने ओळखण्यात इस्त्रायली गुप्तचरांना आलेलं अपयश
२) सीमेवर निगराणी ठेवणारी यंत्रे जसे कॅमेरे, वॉच टॉवर, ड्रोन यावर नको तेवढे अवलंबून राहणे
३) सीमा संरक्षण दलाच्या जवानांना एकाच लष्करी तळावर एकवटून ठेवणे
४) ‘पॅलेस्टिनी लष्करी नेत्यांच्या आपसातील संवादावर पूर्णपणे विश्वास ठेवणे लक्ष ठेवणे इस्त्रायल बारीक लक्ष ठेवून आहे. इस्त्रायलवर हल्ला करण्याची ते कोणतीही तयारी करत नाहीए.’ अशा आशयाच्या मुलाखती या नेत्यांनी टीव्ही चॅनल्सला दिल्याने त्यावर इस्त्रायने ठेवलेला विश्वास
वरील चार गोष्टी इस्त्रायलला भोवल्या असल्याचं इस्त्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर न्यू यॉर्क टाइम्सला सांगितलं आहे.
इस्त्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी वरिष्ठ अधिकारी योएल गुझान्स्की यांनी सध्याच्या परिस्थितीचं एका वाक्यात वर्णन केलं. ते म्हणाले, ‘हमास बाबत गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आम्ही अब्जावधींचा खर्च करतो. आणि एक दिवस पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हे सारं क्षणात धराशाही होतं.’
मुळात ‘हमास’कडून इस्त्रायलला कोणताही मोठा धोका नसल्याचं खुद्द इस्त्रायलच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना वाटत होतं. नेमकी हीच मोठी चूक झाल्याचं इस्त्रायलच्या लष्करी वर्तुळात सध्या बोललं जात आहे. गेल्या वर्षभरात हमास अतिरेक्यांनी गाझा पट्टीमध्ये इस्त्रायल लष्करासोबत कोणतीही मोठी चकमक केलेली नव्हती. गाझा पट्टीमध्ये ‘पॅलेस्टिनीयन इस्लामिक जिहाद’ नावाची छोटी अतिरेकी संघटनाच गेले वर्षभर इस्त्रायल लष्करासोबत नडते आहे. ‘इस्त्रायलवर हल्ला केल्याचा परिणाम ‘हमास’ला माहिती आहे. त्यामुळे हमासचे अतिरेकी हल्ली अतिशय संयमी झालेले दिसतात.’ असं वक्तव्य इस्त्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाची अनेग्बी यांनी या हल्ल्याच्या सहा दिवसांपूर्वी एका रेडिओ मुलाखतीत केलं होतं.
‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्याच आठवड्यात इस्रायलच्या गुप्तचर संघटनांचे वरिष्ठ अधिकारी आणि देशाच्या संरक्षण खात्यातील प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांदरम्यान एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. इस्त्रायलला असलेल्या अत्यंत तातडीच्या धोक्यांची माहिती या बैठकीत देण्यात आली होती. इस्रायलच्या उत्तर सीमेवर लेबनानमधून येणाऱ्या अतिरेक्यांनी निर्माण केलेल्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्याचे या बैठकीत ठरले होते. या बैठकीत ‘हमास’ अतिरेक्यांकडून इस्त्रायलला असलेल्या धोक्याबाबत फारशी चर्चा झाली नव्हती.
इस्त्रायलच्या गुप्तचरांनी काही दिवसांपूर्वी ‘हमास’च्या अतिरेक्यांचा आपसांत होणारा फोन संवाद टॅप केला होता. ‘आपण २०२१ च्या लढाईत इस्त्रायलकडून सपाटून मार खाल्ला होता. आता लगेचच इस्त्रायशी लढा नको’ असं ‘हमास’चे अतिरेकी आपसांत बोलत असल्याचा हा संवाद होता. परंतु हा संवाद खरा होता की इस्त्रायली गुप्तहेरांना चकवा देण्यासाठी होता, याबाबत आता मतभिन्नता आहे.
कॅमेऱ्यांवर भिस्त नडली
गाझा सीमेवर पाळत ठेवणाऱ्या इस्त्रायलच्या यंत्रणेची संपूर्ण भिस्त ही रिमोट कंट्रोलद्वारे संचलित करता येणारे कॅमेरे, सेंसर्स आणि मशीन गन्सवर होती, हे आता स्पष्ट झाले आहे. ही रिमोट कंट्रोल यंत्रणा जणू अभेद्य यंत्रणा आहे, असा अती आत्मविश्वास इस्त्रायलच्या लष्करी कमांडर्सना वाटत असे. परिणामी इस्त्रायल सरकारने गाझा पट्टीवरील सीमेवर तैनात सैनिकांची संख्या कमी करून त्यांना इतरत्र हलवले होते. रिमोट कंट्रोलद्वारे संचलित यंत्रणा ही रिमोट कंट्रोलद्वारेच उद्धवस्त पण करता येते, याचा अंदाज इस्त्रायलला लष्कराला कसा आला नाही, याचं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ‘हमास’च्या अतिरेक्यांनी हल्ला करण्यापूर्वी सर्वप्रथम इस्त्रायलच्या या वॉच टॉवर्स यंत्रणेला सिग्नल पाठवणाऱ्या सेल्युलर टॉवर्सना ड्रोनद्वारे उध्वस्त केले होते. सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने इस्रायली लष्करादरम्यानचा संवादही ठप्प झाला होता. त्यामुळे दूरवर नियंत्रण कक्षात बसलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना सीमेवर काय घडतय याचा अंदाजच आला नसल्याचं बोललं जात आहे.
इस्रायलची गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराचा जगात फार दबदबा होता. परंतु हमास अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलचं लष्कर आणि गुप्तहेर अभेद्य नव्हतं, हे स्पष्ट झालं आहे. ‘लष्कर आणि गुप्तहेर नेमके कुठे चुकले याची संपूर्ण चौकशी होणार. परंतु सध्या ‘हमास’सोबत सुरू असलेल्या युद्धानंतर’ असं एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने ‘न्यू यॉर्क टाइम्स’ला सांगितलं आहे.