देशात या शहरात पाण्याखाली सुरू झाली मेट्रो सेवा
कोलकाता / नवप्रहार मीडिया
वाढती जनसंख्या , वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा याला पर्याय म्हणून मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत वरून चालणारी मेट्रो सुरू करण्यात आली होती. पण आता पाण्याखालून चालणारी मेट्रो सुरू करण्यात आली आहे. कोलकत्ता शहरात देशातील अंडर वॉटर ट्रेन धावली आहे.यामुळे प्रवाश्यांचा वेळ।आणि पैसा अश्या दोन्ही क्षेत्रात बचत होणार आहे.”
बुधवारचा दिवस (6 मार्च) मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या दिवशी भारतात पहिल्यांदा अंडरवॉटर अर्थात पाण्याखालून मेट्रो धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी कोलकात्यात देशातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोच्या बोगद्याचं उद्घाटन झालं. भारतात पहिल्यांदाच अंडरवॉटर मेट्रो धावणार असली, तरी इतर काही देशांमध्ये हा प्रयोग यापूर्वीच यशस्वी झालेला आहे. अनेक देशांमध्ये पाण्याखालून ट्रेन धावते. काही देशांमध्ये तर फार पूर्वीपासून पाण्याखालून ट्रेन धावत आहे. यात जपान, तुर्कीसह इतर काही देशांचा समावेश आहे.
भारतातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन आज झालं; पण काही देशांमध्ये अंडरवॉटर ट्रेन यशस्वीपणे धावत आहेत. अमेरिकेतल्या बार्ट बोगद्यात पाण्याखालून ट्रेन धावते. ही ट्रेन ऑकलँड ते सॅनफ्रान्सिस्को या मार्गावर धावते. तुर्कीत मारमारय बोगद्यातून अंडरवॉटर ट्रेन धावते. हा मार्ग जगातल्या पाण्याखालच्या सर्वांत मोठ्या रेल्वेमार्गांपैकी एक समजला जातो. स्वीडन आणि डेन्मार्कदरम्यान अंडरवॉटर ट्रेन धावते. ही ट्रेन बाल्टिक समुद्राखालून प्रवास करते.
जपान हा देश तंत्रज्ञानात आघाडीवर आहे. या देशात हॉन्शु ते होक्काइडो बेटादरम्यान अंडरवॉटर ट्रेन धावते. हा मार्ग खूपच सुंदर आहे. ही ट्रेन एका बोगद्यातून जात असल्यामुळे आपण पाण्याखालून प्रवास करताना बाहेरच्या गोष्टी पाहू शकत नाही. पाण्याखालून धावणाऱ्या ट्रेनच्या बाबतीत यूके आणि फ्रान्सदरम्यान धावणाऱ्या अंडरवॉटर ट्रेनचा जगात पहिला क्रमांक लागू शकतो. कारण ही ट्रेन अनेक वर्षांपासून पाण्याखालून धावत आहे. ही ट्रेन फोकस्टोन ते कॅलेस या मार्गावर धावत आहे.
या प्रमुख देशांच्या यादीत आता भारताचा समावेश होत आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. अंडरवॉटर मेट्रोचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अशा प्रकारचे प्रयोग भारतातल्या इतर प्रमुख शहरांमध्ये केले जाऊ शकतात.