दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक धास्ती किंवा व्यूहरचना
बैठकीत महत्वपूर्ण निर्णय ; भारत जोडो च्या धर्तीवर बस यात्रा
नवी दिल्ली / पी. संजू
वर्षभरापूर्वी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर काँग्रेस मध्ये देखील फूट पडण्याची चर्चा सुरू असतांना काँग्रेस हायकमांड ने दिल्लीत महाराष्ट्रातील दिग्गज कॉंग्रेस नेत्यांची बैठक बोलावली होती. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून या गोष्टीचे खंडन करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बोलावलेली बैठक ही धास्ती किंवा व्यूहरचना असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात जबरदस्त तयारी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडी पाहता आता काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते महाराष्ट्रात शड्डू ठोकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेस महाराष्ट्रात भारत जोडोच्या धर्तीवर बस यात्रा काढणार
महाराष्ट्रात पावसाळ्यानंतर काँग्रेसकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच त्यांनंतर बस यात्रा काढण्यात येणार आहे. ही बस यात्रा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली. काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीनंतर के सी वेणुगोपाल आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली.
राहुल गांधी महाराष्ट्र दौरा करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीनंतर वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली. तर राहुल गांधी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र दौरा करतील. त्यांच्या महाराष्ट्रात सभा होणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
“नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एक बसयात्रा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व नेत्यांची ही बसयात्रा असणार आहे”, अशी माहिती वेणुगोपाल यांनी दिली. तर “राहुल गांधी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र दौरा करतील. त्यांच्या महाराष्ट्रात सभा होणार आहेत”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
“आम्ही रॅली काढणार आहोत. त्यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभा होणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये या सभा घेण्यात येणार आहेत”, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
दिल्लीतील बैठकीला ‘या’ नेत्यांची उपस्थिती
दिल्लीतील आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, अमित देशमुख, संजय निरूपम, नसीम खान, वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, एच के पाटील, भाई जगताप, कुणाल पाटील, माणिकराव ठाकरे, सुनिल केदार, विजय वड्डेट्टीवार, नितीन राऊत, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांची उपस्थिती होती.