अंबरनाथ मध्ये काँग्रेस कडून निवडून आलेले नगरसेवक भाजपात

अंबरनाथ / विशेष प्रतिनिधी
सध्या राज्यातील राजकारणात सरळ सरळ नौटंकी सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काही ठिकाणी राजकीय पक्षात अभद्र युती देखील पाहायला मिळाली. पण अंबरनाथ मध्ये जे घडले ते विचित्र असेच म्हणावे लागेल. सोबतच या गोष्टीमुळे काँग्रेस ला मोठे खिंडार पडले आहे.
अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत नुकतेच निवडून आलेले 12 नगर सेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेससाठी हा सर्वात मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजिवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड हे 12 नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते तसेच मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. संजीव नाईक आणि दीपक म्हात्रे आदींचीही यावेळी उपस्थिती राहणार आहे.
काय घडलं होतं ?
अंबरनाथ शहरात अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. या आघाडीत भाजप, अजितदादा गट आणि काँग्रेस होती. त्यामुळे काँग्रेसची भाजपसोबत युती झाल्याची राज्यभर चर्चा सुरू होती. राष्ट्रीय पातळीवरही या चर्चेने लक्ष वेधलं होतं. त्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर दखल घेत या 12 नगरसेवकांवर कारवाई केली. त्यामुळे काँग्रेसचे अंबरनाथचे काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील नाराज झाले होते. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या नगरसेवकांनी भाजपमध्ये जाणं हा काँग्रेससाठी धक्का मानलं जात आहे. निवडून आलेले नगरसेवक नितीमत्ता पाळत नाहीत. पक्षादेश मानत नाहीत. स्वत:च्या मनाने कारभार करतात. अशावेळी विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.
भाजपसोबत जाणार नाही
दरम्यान, कालच हर्षवर्धन सपकाळ यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. भाजपसोबत आमचा कोणताही संबंध नाही. निवडणूक लढवताना त्यांच्याशी कोणताही घरोबा केलेला नाही. आमच्या नगरसेवकांनी कुणालाही पाठिंबा दिला नाही. आमचा भाजपला पाठिंबा नाही. आम्ही भाजप सोबत जाणार नाही. काँगेसच्या तालुका अध्यक्षांना याबाबतचं स्पष्टकरणं मागितलं आहे, असं सपकाळ म्हणाले होते.




