तीन तासांसाठी मृत झालेल्या मारियांद्रीने स्वर्गात जाऊन आल्याचा केला दावा
मुंबई / नवप्रहार डेस्क
मेल्या नंतर मनुष्याचे काय होते. त्याचा आत्मा मरतो किंवा तो जिवंत असतो. मेल्या नंतर माणूस स्वर्गात जातो किंवा नरकात. आणि ते जग कसे असते ? हे जाणून घेण्याची उत्सुकता भारतीयांनाच नव्हे तर जगातील सगळ्याच देशातील लोकांना असते. तीन तासासाठी मरण पावलेल्या एका तरुणीने आपला अनुभव सांगितला आहे.
काही जण मृत्यू होऊनही परत जिवंत झाल्याचा दावा करतात. खरं तर असे अनेक किस्से आपण ऐकले आहेत; पण एका मुलीनं सांगितलेला अनुभव जरा वेगळाच आहे. मी काही तासांसाठी मरण पावले आणि नंतर पुन्हा जिवंत झाले, असा दावा या मुलीनं केला आहे.
खरं तर मृत्यूवेळी एखाद्या व्यक्तीला काय वाटतं, ती काय विचार करत असते, तिचे शेवटचे शब्द काय आहेत, हे जग सोडल्यावर दुसऱ्या जगात तिला काय मिळतं, अशा अनेक प्रश्नांविषयी लोकांच्या मनात कुतुहल असतं. मारियंद्री कार्डेनास नावाच्या 24 वर्षांच्या मुलीनं सांगितलं, की माझा मृत्यू केवळ तीन तासांसाठी झाला होता. हे जग सोडून मी स्वर्गात गेले. ते जग या जगापेक्षा खूप वेगळं असल्याचं मला दिसलं.
फक्त तीन तासांसाठी झाला होता मृत्यू
मारियंद्री कार्डेनास ही एक ग्राफिक डिझायनर आहे. ती घरून काम करत असताना तिला अचानक गुदमरल्यासारखं वाटलं. आपल्याला बोलता येत नाही आणि सगळं शरीर सुन्न झालंय, असं तिला वाटलं. तिचं शरीर गोठायला लागलं होतं. बेशुद्ध होण्यापूर्वी तिला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं तिला डॉक्टरांनी कोमात ठेवलं. डेली स्टारच्या वृत्तानुसार, मारियंद्रीने सांगितलं, की ‘मी शेवटच्या क्षणी काही शब्द ऐकले. ती आपल्याला सोडून जात आहे,’ असं त्या वेळी डॉक्टर सांगत होते. पुढच्याच क्षणी तिने या जगाचा निरोप घेतला आणि ती दुसऱ्या जगात पोहोचली.
मी देवाला भेटून आले
मारियंद्रीने सांगितलं, की ‘त्या ठिकाणी सूर्य, चंद्र किंवा तारे नसतानादेखील लख्ख प्रकाश होता. मी कधीही न पाहिलेले वेगवेगळे पदार्थ ठेवलेले होते. तो माणूस नसून प्रकाश होता. सगळे एकमेकांशी मनातून संवाद साधत होते. मला माझ्या पूर्वायुष्याविषयी काही आठवत नव्हतं. या दरम्यान माझी भेट देवांशी झाली. त्यांनी सर्व वातावरण उजळून टाकलं होतं. ते खूप आनंदी आणि हसत होते. ते सगळ्यांशी हसत संवाद साधत होते. तिथं माझं स्वागत केलं गेलं. मला खूप आनंद आणि आराम वाटत होता.’
या जगात परत आले
‘मारियंद्रीला परत जावं लागेल. कारण तिची वेळ अजून आलेली नाही,’ असं त्या वेळी देवानं सांगितलं. स्वर्गात ती तीन तास होती; मात्र पृथ्वीवर तीन दिवस उलटून गेले होते. पृथ्वीवर परतल्यावर ती कोमातून बाहेर आली. दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज दिला गेला. मी खात्रीपूर्वक सांगते, की मी देवाला भेटले. देवानेच माझी मृत्यूनंतरचं जग दाखवण्यासाठी निवड केली होती, असा दावा मारियंद्रीनं केला आहे.