पिंपरी चिंचवड येथे अजित पवार गटाचे वाघेरे यांनी बांधले शिवबंधन
वाघेरे राहिले आहेत माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष
पिंपरी चिंचवड / नवप्रहार मीडिया
मागील अनेक दिवसां पासून संजोग वाघेरे यांना घेऊन सुरू असलेल्या चर्चेला शेवटी पूर्णविराम मिळाले आहे. माजी महापौर आणि शहराध्यक्ष असलेले वाघेरे यांनी उबाठा सेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधून घेतले आहे. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे.संजोग वाघेरे यांनी आज शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मातोश्री येथे शिवबंधन बांधले.
पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनीच संजोग वाघेरेंना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवेश दिला. संजोग वाघेरेंचा हा पक्षप्रवेश पिंपरी-चिंचवड व मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या विरोधात वाघेरे यांना मावळ मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांचेजवळचे संजोग वाघेरे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात होते. ते लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आज त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने अजित पवारांना पिंपरीत मोठा धक्का बसणार आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत कुणाला कुणाची भेट घ्यायची, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने ते उमेदवार शोधत आहेत. असे म्हणाले होते. महायुतीतमावळची जागाकोणालामिळणार याचीचाचपणी एखाद्याने केली असेल. त्याला वाटत असेल की, येथे तिकीट मिळणे कठीण आहे, त्यामुळे त्यांनी पर्याय शोधला असेल. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे हे अजित पवार यांच्या गटात होते. अजित पवार आज पिंपरीत असतानाच वाघेरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
पक्षप्रवेशावेळी संजोग वाघेरें म्हणाले, करोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनामुळेच आपण या विषाणूला रोखू शकलो. तेव्हाच मी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीने प्रभावित झालो होतो. संजय राऊतही दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला दिशा देण्याचं काम करत असतात या मंडळींनी (सत्ताधारी) आता संविधानाच्या बाबतीत चुकीची भूमिका घेतली आहे. अनेक वेगळे मुद्दे काढले आहेत. या सगळ्याचा विचार आमच्या कार्यकर्त्यांसह आम्ही केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे पिंपरी-चिंचवडचे महापौर होते. संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. तसेच त्यांनी महापौर म्हणून त्यांनी कारभार सांभाळला आहे. त्यांच्या पत्नी देखील नगरसेविका होत्या. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. संजोग वाघेरे राष्ट्रवादी चे सलग आठ वर्षांपासून शहराध्यक्ष आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या वाघेरे कुटुंबियाकडे पहिले जाते.