सामाजिक
माजी आमदारांनी श्रमदान करत व्यवस्थित केला रस्ता ; जिंकली नागरिकांची मने
दीपक आत्राम यांनी स्वखर्चाने केली रस्त्याची डागडुजी
गडचिरोली / तिलोत्तमा समर हाजरा
सतत बरसणारा पाऊस आणि रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे एसटी महामंडळाकडून मूलचेरा तालुक्यातील खुदिरामपल्ली-श्रीनगर-मूलचेरा मार्गावर श्रीनगर, देवनगर मार्गावरील बससेवा बामद करण्यात आली होती. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तसेच शेतकरी व नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व भारत राष्ट्र समितीचे नेते तथा माजी आमदार दीपक आत्राम यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी स्वतः भेट देत त्या पुलाची आणि रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच परिसरातील गावकरी सोबत घेत स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे स्वतः श्रमदानाने बुजवून रस्ता सुरळीत करून दिला.
त्यांनी या मार्गावर असलेल्या अरुंद पुल आणि त्यावर आणि आजूबाजूला पडलेल्या खड्ड्यांमुळे एसटी ला अडचण होत असल्याचे पाहून आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेत गावकऱ्यांना सोबत घेत स्वतः श्रमदान करून हे खड्डे बुजवले. यासाठी झालेला खर्च देखील त्यांनीच केला.
मूलचेरा तालुक्यातील दयनीय अवस्थेत असलेल्या मार्गामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा समना करावा लागत होता. हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही दखल घेण्यात आली नाही. अश्या बिकट काळात माजी आमदार दीपक आत्राम यांनी नागरिकांच्या मदतीला धावून जात हा मार्ग स्वखर्चाने दुरुस्त केला.
नागरिकांना आला सुस्त प्रशासनाचा अनुभव –
सध्याचे प्रशासन सुस्त असून त्यांना सामान्य नागरिक तथा शालेय विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या समस्यांशी त्यांना काही देणे घेणे नाही. संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून मागील अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाले नाही. अनेक रस्ते कागदोपत्री तयार झाले असून लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने गैरव्यवहार होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शासनकडून दुरुस्ती आणि नूतनीकरणाची वाट न बघता आपण सर्वजणांनी श्रमदान करून हा मार्ग व्यवस्थित करण्याची तयारी दर्शवली.
आत्राम यांनी नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन –
मार्ग व्यवस्थित नसल्याने शालेय विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यावर तथा सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च मी स्वतः करेन, असे माजी आमदार दीपक आत्राम म्हणाले. तसेच त्यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले. कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आत्राम यांची आर्थिक मदत व सर्वांच्या श्रमदानाने बघता-बघता हा मार्ग वाहतुकीसाठी तयार झाला.
बसफेरी झाली सुरू…
हा रस्ता दयनीय अवस्थेत असल्याने येथील बसफेरीही बंद झाली होती. रस्ता दुरुस्त होताच माजी आमदार दीपक आत्राम यांनी लगेच राज्य परिवहन महामंडळाशी संपर्क साधत दुरुस्त केलेल्या मार्गावरून बसगाडी सुरू करण्याची मागणी केली. महामंडळाने ही मागणी लगेच मान्य करून बसफेरी सुरू केली. त्यामुळे नागरिकांची ही महत्त्वाची समस्याहीसुटली आहे
विद्यार्थी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य आत्राम यांचे मानले आभार रस्त्याची डागडुजी झाल्याने शालेय विद्यार्थी आणि महिलांना कमी पैश्यात प्रवास आणि शेतकरी तथा इतर सामान्य नागरिकांना वाहतुकीचा मार्ग सोईस्कर झाला. शाळकरी विद्यार्थी, पालकवर्ग व शेतकरी तथा गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करून माजी आमदार दीपक आत्राम यांचे आभार मानले.
यावेळी माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह मूलचेरा बीआरएसचे नेते टिल्लू मुखर्जी, सुबोल मंडल, अनिल मंडल, बाबूल दास, सुधीर पोद्दार, कृष्णा सरकार, अविनाश दास, रॉबिन मिस्त्री, निताई बाला, बिनाई साना, मारोती बंडावार, मनमत रॉयसह श्रीनगर, देवनगर येथील गावकरी व आविसं,बीआरएसचे पदाधिकारी आणि परिसरातील गावकरी उपस्थित होते.