जरांगे क्या टीकेवर राऊतांचे प्रत्युत्तर
मुंबई / नवप्रहार डेस्क
मराठा आरक्षणा साठी राज्यभर रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील यांनी सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता जरांगे यांच्या टीकेला भाजपा आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राजेंद्र राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राऊत म्हणाले, मनोज जरागेंनी माझ्यावर आरोप करतांना पुराव्यानीशी आरोप करावेत. ते कुणाचेही संबंध कुणाशी जोडतात. खरंतर जरांगे दादांनी आरक्षणाचा मुद्दा उचलला तेव्हा मला आनंद झाला. मीही त्या मोर्चात सहभागी झालोय. माझं भाजपला समर्थन असलं तरी मी समाजासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. समाजात फुट पाडायला मी काही दुधखुळा नाही…. बार्शिच्या विकासासाठी मी सरकारकडून मोठा निधी आणला. मी चमेचेगीरी करणार नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, असं राऊत म्हणाले.
स्वत:ला मराठा समाजाचे मालक समजू नका…
ते म्हणाले, मनोज जरांगेंना मराठा समाजातील सगळ्याच आमदारांनी मदत केली. मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळाने तुम्हाला मान-सन्मान दिलाय. आज तुम्हीच मराठा नेत्यांना शिव्या देत सुटता. कोणताही खंडोजी खोपडे तुम्हाला काहीतरी सांगतो. आणि तुम्ही कुणालाही शिव्यांची लाखोळी वाहता. ज्या विखे पाटलांनी पहिला साखर कारखाना काढला आणि मराठ्यांच्या उसाला भाव देऊन न्याय दिला. त्यांच्यावरही तुम्ही टीका करता. पण, तुम्हीच एकटे मराठा समाजाचे मालक आहात, असं समजू नका. तुमच्यावर एसआयटीची चौकशी लागली, तेव्हा ती आम्ही थांबवली. मराठा समाज बांधवावर गुन्हे दाखल झाले तेव्हा गृहमंत्र्यांना गुन्हे मागे घ्यायला कुणी सांगितले?, असं राऊत म्हणाले.
तुमचं ऐक थेंबही रक्त सांडलं नाही…
अंतरवली सराटीत लाठीचार्ज सारखी दुर्दैवी घटना घडली, हाच तुमचा उदय आहे. पण, त्या गोंधळात तुमचं एक थेबंही रक्त निघालं नाही. माझ्या पाठीवर वार आहेत. माझ्या किती जमीन गेल्या हे पहायला या एकदा तुम्ही. कुणाचंही ऐकून एखाद्या मराठा नेत्याला काहीही बोलू नका, असा सल्ला राऊतांनी दिला.