शाशकीय

या कारणाने आदिवासी समाजाने टाकला मतदानावर बहिष्कार

Spread the love
तुमसर तालुक्यातील सक्करधरा गावातील घटना 
गावातील मतदान केंद्र इतरत्र हलविल्यामुळे नाराजी 

भंडारा /नवप्रहार डेस्क 

गावातील मतदान केंद्र हटविल्याच्या निषेधार्थ आणि नागरिकांना मूलभूत सुविधा न पुरविल्याने मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. शासन आणि प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास हा बहिष्कार पुढच्या निवडणुकीत देखील कायम राहू शकतो असा निर्वाणीचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. हा प्रकार तुमसर तालुक्यातील सक्करधरा येथे घडला आहे.

 

सातपुडा पर्वतरांगांच्या घनदाट जंगलात असणाऱ्या आदिवासी गावात असणारे मतदान केंद्र दोन किमी अंतरावरील घानोड गावात हटविण्यात आले आहे. हे केंद्र हटविल्यास लोकसभा निवडणुकीत बहिष्कार घातला जाईल, असा इशारा यापूर्वीच गावातील मतदारांनी दिला होता. तहसीलदारांना निवेदनही दिले होते. महिनाभरापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. मतदारांचे मतदान संदर्भात मन वळविण्याचे प्रयत्नही प्रशासकीय यंत्रणेकडून झाले नाही. गावात मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत असणारे हक्काचे मतदान केंद्र शेजारी असणाऱ्या घानोड गावात हटविण्याच्या निर्णयानंतर गावकऱ्यांनी आधी जाहीर केल्यानुसार मतदानावर बहिष्कार घातला.

गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गावांचे प्रशासकीय कामकाज १३ किमी अंतरावरील धुटेरा गावातून होत आहे. सहा गावे मिळून धुटेरा ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली आहे. परंतु, आदिवासीच्या हक्काच्या योजना, मूलभूत सुविधा, शासकीय योजना व अन्य योजना गावात पोहोचल्या नाहीत. गावात कधी सरपंच व सचिव गावात येत नसल्याने गावकऱ्यांना योजनांची माहिती होत नाहीत. गावात रोहयोचे कामे सुरू करण्यात येत नसल्याने गावकऱ्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे.

ग्रामपंचायत दूर असल्याने घानोड आणि सक्करधरा अशा दोन गावांची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. परंतु, सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, अशा अनेक तक्रारी गावकऱ्यांच्या आहेत. या मूलभूत प्रश्नांकडे असेच दुर्लक्ष राहिल्यास पुढील विधानसभा निवडणुकीतही बहिष्काराचा निर्णय राहील, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close