क्राइम

चार रंगाच्या डब्यात तुकड्यात सापडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क 

                पेंट च्या डब्यात सापडलेल्या मृतदेहाच्या तुकड्याचे रहस्य उघडण्यात पोलिसांना यश आले आहे. आंतरजातीय संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

 रघुनंदन पासवान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो 21 वर्षांचा होता. रघुनंदन पासवान बिहारच्या दरभंगा जिल्ह्याच्या कन्होली गावाचा रहिवासी होता.रघुनंदना मित्रही या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे, त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे. आंतरजातीय संबंध हे या हत्येप्रकरणाचं मुख्य कारण असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 17 वर्षांच्या मुलीचा रघुनंदन पासवानसोबत प्रेमभंग झाला, यानंतर मुलीचे भाऊ तिला मुंबईला घेऊन आले. तरीही पासवानने मुलीसोबत पुन्हा संबंध जोडण्यासाठी प्रयत्न केले, यामुळे मुलीच्या कुटुंबाचा संताप अनावर झाला, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

टॅटूवरून पटली ओळख

मुलीच्या भावांनी भाईंदरमध्ये रघुनंदन पासवानची हत्या केली, यानंतर रिक्षेने त्यांनी रघुनंदनचा मृतदेह गोराईला आणला. याप्रकरणी रिक्षा ड्रायव्हरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मृतदेहाचे 7 तुकडे करण्यात आले असल्यामुळे पोलिसांना ओळख पटवणं कठीण जात होतं, पण रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी रघुनंदनच्या हातावर असलेल्या RA या टॅटूवरून ओळख पटवली. RA या टॅटूमध्ये R हे नाव रघुनंदनचं तर A हे नाव मुलीचं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

मुलीच्या घरच्यांनी मुलाची हत्या केल्याचा संशय रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी केला आहे. माझा मुलगा आणि ती मुलगी एकमेकांच्या संपर्कात होते, मुलीच्या कुटुंबाला दोघांमध्ये आंतरजातीय प्रेम संबंध असल्याचा संशय होता. मंगळवारी पोलिसांनी मला बोलावलं. मी टॅटूवरून मुलाला ओळखलं. पोलिसांनी मुलीच्या एका भावाला ताब्यात घेतलं आहे, असं रघुनंदनच्या वडिलांनी सांगितलं आहे.

वडिलांचे गंभीर आरोप

माझा मुलगा पुण्यातल्या एका खासगी कंपनीमध्ये काम करत होता. दिवाळीमध्ये सुट्टीसाठी तो काही दिवस घरी आला होता. शाळा सोडलेला रघुनंदन पुण्याच्या सारसवाडीमध्ये एका कंपनीमध्ये काम करायचा. आधी तो बिहारमधल्या एका रुग्मालयात काम करत होता, तिकडे त्याने या मुलीला औषधांसाठी मदत केली होती, तेव्हापासून त्या दोघांची ओळख झाली होती. तसंच दोघंही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. मुलीच्या कुटुंबाला याबाबत समजलं आणि तिच्या छोट्या भावाने रघुनंदनला जीवे मारण्याची धमकी दिली, असा जबाब रघुनंदनच्या वडिलांनी पोलिसांना दिला आहे.

या प्रकरणाबाबत आपण गावच्या प्रमुखाचीही मदत घेतली, यानंतर त्याने मुलीच्या कुटुंबाशी संपर्क केला आणि वाद मिटवला. मी मुलाला हॉस्पिटलची नोकरी सोडायला लावली, यानंतर तो मागचे 8 महिने पुण्यातल्या खासगी कंपनीत कामाला होता, असं रघुनंदनच्या वडिलांनी सांगितलं आहे.

31 ऑक्टोबरला रघुनंदनने अचानक घर सोडलं. मित्रांसोबत मुंबईला जात असल्याचं त्याने घरी सांगितलं. यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. मुलाशी संपर्क होत नसल्यामुळे घाबरलेले जितेंद्र पासवान पुण्याला गेले आणि मग अंधेरीला आले, जे त्याचं शेवटचं लोकेशन होतं. यानंतर जितेंद्र पासवान यांनी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये मुलगा हरवल्याची तक्रार दिली.

मुलीच्या भावाने इतरांना घेऊन कट रचला, यानंतर त्यांनी माझ्या मुलाला पुण्याला आणि मग मुंबईला बोलावलं, मग अंधेरीमध्ये त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप जितेंद्र पासवान यांनी केला आहे. जितेंद्र पासवान हे दरभंगा रुग्णालयात सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात. या घटनेमुळे मलाच नाही तर संपूर्ण कुटुंब आणि गावालाही धक्का बसल्याचं जितेंद्र पासवान म्हणाले. मुलाचा मृतदेह गावाला घेऊन जाण्यासाठी जितेंद्र पासवान अजूनही मुंबईतच आहेत.

गोराईच्या बाबरपाडा परिसरातल्या नागरिकांना संशयास्पद डब्ब्यांमधून दुर्गंध येऊ लागला, त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी डबे उघडले असता मृतदेहाचे 7 तुकडे करण्यात आल्याचं दिसलं. यानंतर पोलिसांनी स्वत:च गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close