पोटभरू व सत्ताभोगी नेत्यांनी निचतेचा स्तर गाठला-किशोर तिवारी
प्रतिनिधी यवतमाळ
लोकसभा तसेच त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणूकीदरम्यान राजकीय नेत्यांनी लोकहिताच्या सार्वजनिक जीवनात निचतेचा स्तर गाठला, अशी खंत सामाजिक व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुक २०२४ च्या जनादेशाची हवा बघुन अनेकांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची कास धरली. येणारी सत्ता भोगण्यासाठी आपली राजकीय विचारसरणी सोडुन पक्षांतर केलेल्या मंडळींचा विधान सभेच्या निवडणुकीत झालेल्या अभुतपुर्व पराभवामुळे भ्रम निरास झाला. त्यानंतर नागपूरच्या आधिवेशनात सत्तेची कास कशीतरी पुन्हा पकडावी यासाठी झालेली लाजिरवाणी धडपड पाहील्यावर या दशकातील “पोटभरू व सत्ताभोगी” राजकीय जमातीने लोकहिताच्या सार्वजनिक जीवनाचा निचतेचा स्तर गाठल्याचा अनुभव आल्याची प्रतिक्रिया किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. देशात काँग्रेसने सतत सत्तेत राहील्यामुळे “पोटभरू व सत्ताभोगी” राजकीय जमाती निर्माण केली. या जमातीने भ्रष्टाचार व सत्तेचा दुरुपयोग करून सर्व संसाधनांवर ताबा मिळविला होता. अवैध धंदे, दारूची दुकाने, मोफत जमिनी लाटणे, सरकारी अनुदानाच्या शाळा, महाविद्यालये, सरकारी कंपन्यांचा पुरवठा, गॅस वितरण, सरकारी पुरवठा, कंत्राटे लाटून सरकारी लूट सुरु केली होती. यादरम्यान कॉंग्रेसने विरोधी पक्ष नेत्यांना सार्वजनिक जीवनात या लाभापासून शेकडो किलोमीटर दूर ठेवल्याने राष्ट्राचे लचके तोडण्यात त्यांचा सक्रीय सहभाग नव्हता. मात्र २०१४ च्या राष्ट्रीय निवडणुकीत देशात गुजराती लुटारूंची नवी टीम देश लुटीसाठी आरूढ झाली. या सनातनी “पोटभरू व सत्ताभोगी” राजकीय काँग्रेस विचारसरणीच्या जमातीमुळे प्रचंड खळबळ उडाली. नव्याने केंद्रात सत्तेत आलेल्या तानाशाह मंडळीने या चोरांना भाजपाची दारे उघडी करीत आपल्या सरकारी लूटीला आम्ही आहे तसेच सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आमच्या देश विकण्याचा एकसुत्री कार्यक्रमावर मौन ठेवावे अशी अट ठेवत प्रवेश देणे सुरु केले. यामुळे भारतात सरकार तसेच लोकविरोधी निर्णयावर बोलणारा संघर्ष करणारा विपक्ष कमजोर होण्याची प्रक्रीया सुरु झाली. आज संधिसाधु, लाचार, पोटभरु, आयाराम, गयाराम नासलेल्या राजकीय मंडळींची जमात निर्माण करण्यात नैतिकतेच्या राष्ट्र निर्माणाच्या गप्पा करणा-या तसेच संस्काराचा जगातील ठेका घेतलेल्या या पाखंडी राज्यकर्त्यांना यश आल्याची टिका किशोर तिवारी यांनी केली आहे.
कोण कुठे सांगने कठीन
भाजपने २०१९ ते २०२४ मध्ये राजकीय अवपतनाचा नवीन इतिहास घडविला आहे. साऱ्या भारतात राजकीय संस्कृती व राजकारणाचा स्तर जपण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रात २०१९ नंतर “पोटभरू व सत्ताभोगी ” राजकीय जमातीने आपला नीतिभक्षक तांडव सुरु केला व आज कोण कोणाच्या सोबत आहे हे सांगणे कठीण झाले आहे. प्रत्येक नेता व कार्यकर्ता लोकनिधीची लुट करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार आहे. सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना पद पाहिजे आणि त्यासाठी ही मंडळी कुठल्याही स्तरावर जाण्यास तयार आहे. नीतिमत्ता व नैतिकतेचा तसेच सनातन धर्म संस्कृतीसाठी देशात सामाजिक सदभाव व सलोखा नष्ट करणाऱ्या विचारांच्या नेत्यांना घरी बसविण्यात उपयशी ठरलेला संघ सुध्दा या परिस्थितीला जबाबदार असल्याची टिका किशोर तिवारी यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील पतनाचे अमित शाह व देवेंद्र फडणवीस शिल्पकार
महाराष्ट्रात राजकीय विचारसरणी व तत्वे जपण्याची परंपरा होती. ईडी सीबीआय निवडणूक आयोग न्यायालय यांचा अनियंत्रित बेलगाम वापर करून सतत सत्तेत राहल्यामुळे “पोटभरू व सत्ताभोगी जमात महाराष्ट्रात अस्तित्वात आली. जातीच्या, पैशाच्या, गुंडगिरीच्या भरोशावर राजकीय साम्राज्य निर्माण केलेल्या नेत्यांना फक्त राजसत्ता व संसाधन लुटीचे लक्ष ठेवुन भाजपात घेणे हा एकसूत्री कार्यक्रम अमित शाह यांनी आपल्या देवेंद्र फडणवीस आशिष शेलार या सारख्या नीतिभ्रष्ट नेत्यांना सोबत घेऊन सुरु केला. हा कार्यक्रम आज निच स्तरावर पोहचला असून मोठे जनआंदोलन झाले नाहीतर अविरत सुरु राहणार आहे. महाराष्ट्र हि संताची भूमी आहे. या ठिकाणी “पोटभरू व सत्ताभोगी ” राजकीय नेते यांचा नायनाट करण्यासाठी लोक जागरण मोहीम जशी दक्षिण पुर्व आशियात सुरु झाली आहे तशी भारतात सुद्धा युवा पिढी हातात घेऊन करतील असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे.