आमदार अपात्रते संदर्भात आज पासून होणार सुनावणीला सुरवात
मुंबई / नवप्रहार मीडिया
राजकीय क्षेत्रात अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या 16 आमदार अपात्रते संदर्भात आज विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर सुनवाईला सुरवात होणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सूनवाई होणार आहे.
राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाला घेऊन राजकीय वातावरण तापले असतांनाच एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. आज पासून 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात सूनवाईला सुरवात होणार आहे.
दुपारी 12 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार असून याआधी ठाकरे गटाने मोठी रणनिती आखली आहे. आज होणाऱ्या सुनावणीला कसं सामोरं जायचं याबाबत ठाकरे गटाकडून नियोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या वतीने दोन वकील विधानसभा अध्यक्षांसमोर आमदारांची बाजू मांडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जर आमदारांना आपलं म्हणणं मांडा, असं सांगितलं तरच ठाकरे गटाचे आमदार स्वतः आपली भूमिका मांडतील. दरम्यान, सुनावणीला सुरुवात होण्याआधी मुंबईत ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक देखील बोलावण्यात आली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुंबईतील कार्यालयात सकाळी 11 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर ठाकरे गटाचे आमदार विधीमंडळाच्या सभागृहात सुनावणीसाठी हजर राहणार आहे. त्यामुळं या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तब्बल 34 याचिकांवर होणार सुनावणी
दरम्यान, शिंदे गटातील 40 आणि ठाकरे गटातील 14 अशा 54 आमदारांच्या मिळून 34 याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहे. या सुनावणीसाठी दोन्ही गटांकडून वकिलांची फौजही तयार ठेवण्यात आली आहे. तसंच आमदाराही प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहणार आहे.
याआधी दोन्ही गटांनी आपलं लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केलं होतं. शिंदे गटाकडून तब्बल 6 हजार पानांचं उत्तर सादर करण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरे गटाने देखील आपलं म्हणणं लेखी स्वरुपात मांडलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, नेमके कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरवणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.