खून करून बनला साधू पण पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही

विम्याच्या रकमेसाठी भिकाऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या
नाशिक / नवप्रहार ब्युरो
विम्याची रक्कम मिळविण्यासाठी विमाधारक व्यक्तीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा असलेल्या भिकाऱ्याची हत्या करून संशयित विमाधारकाचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महत्वाचे असे की यानंतर या आरोपीने नर्मदा परिक्रमा , कुंभमेळ्यात हजेरी लावल्याचेही समोर आले आहे.
तीन वर्षापूर्वी विम्याचा लाभ घेण्यासाठी एका भिकाऱ्याला पाच जणांनी म्हसरुळ शिवारात ठार मारले होते.या गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपी योगेश राजेंद्र साळवी याला अखेर पंचवटीत गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी विम्याचे पैसे मिळवण्यासाठी भिकाऱ्याची हत्या केली होती.
आरोपी योगेशने भोंदूबाबाचे वेशांतर करत नर्मदा परिक्रमा, प्रयागराजच्या कुंभमेळ्यातसुद्धा मिरवल्याचेही समोर आले आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२२ साली एका अनोळखी भिकाऱ्याचा निघृणपणे खून झाला होता. त्यानंतर वर्षभराने मुंबई नाका हद्दीत विम्याची रक्कम लाटण्यासाठी म्हसरुळमधील भिकाऱ्याच्या खुनातील संशयित विमाधारकाचा खून करण्यात आला. या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी भिकाऱ्याचा खूनही उघडकीस आणला.
याप्रकरणी फिर्यादीवरून म्हसरुळ पोलिस ठाण्यात संशयित आरोपी मंगेश सावकार, रजनी उके, दीपक भारुडकर, प्रणव साळवी, योगेश साळवी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात योगेश हा मागील तीन वर्षापासून पोलिसांना हवा होता. याबाबत तपास करताना गुन्हे शाखेचे अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप यांना त्याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव स्टॅण्ड भागात सापळा रचला होता. रविवारी सायंकाळी सात वाजता योगेश तिथे येताच त्याला हेरून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
विमाधारकाच्या विम्याची रक्कम मिळविण्यासाठी त्या विमाधारकाच्या चेहऱ्याशी जुळणारा चेहरा शोधून म्हसरुळला या टोळीने भिकाऱ्याचा खून केला होता. त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवून तोच व्यक्ती हा विमाधारक आहे, असा बनाव करण्याचा डाव या टोळीचा होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर या टोळीने दुसरा विमाधारक अशोक भालेराव याचा खून केला. टोळीतील इतर सदस्यांनी संगनमताने इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ रात्री भालेराव याचा काटा काढून अपघाती मृत्यूचा बनाव रचला होता. सध्या ही टोळी भालेराव यांच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.