जय भवानी जय शिवाजी च्या घोषणेने दुमदुमली मोर्शी नागरी
मोर्शी(तालुकाप्रतिनिधी)
शिवतीर्थ प्रतिष्ठान व शिवजयंती उत्सव समिती मोर्शीच्या वतीने दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या न भूतो न भविष्यती शोभायात्रा रॅलीने मोर्शीनगरी दुमदुमली.
या रॅलीत ट्रॅक्टरवर सजवलेल्या झाॅक्या,वारकरी संप्रदाय दिंडी,मलखांब पथक, आदिवासी नृत्य व ढोल ताशा प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले.
शिंभोरा रोडवर असलेल्या वृंदावन मंगल कार्यालयापासून दि.19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता या भव्यदिव्य शोभायात्रा रॅलीची सुरुवात करण्यात आली.सर्वप्रथम खासदार डॉ.अनिल बोंडे शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील सोमवंशी यांच्या शुभहस्ते जाणता राजा शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा अर्चा व महाआरती करून रॅलीची सुरुवात करण्यात आली.ही रॅली छत्रपती शिवाजी चौक, जयस्तंभ चौक,व्यापारी बाजारपेठ,गांधी चौक, गुजरी बाजार,सूर्योदय मंडळ,कामगार चौक ते थेट पंजाबबाबा सभागृह येथे रॅलीची सांगता करण्यात आली. शोभायात्रेदरम्यान 11 ट्रॅक्टर सजविण्यात येऊन त्यावर लवकुश, जय हनुमान,गोवर्धन पर्वत,राम सीता लक्ष्मण वामन अवतार,झाशीची राणी,श्रीराम दरबार, अहिल्या उद्धार,केवट प्रसंग,लक्ष्मीनारायण, शिवपार्वती,गोमाता, भारतमाता मूर्ती,बजरंग बलीची विशाल मूर्ती अशा विविध प्रकारच्या साकारण्यात आलेल्या झाॅक्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. समोर वारकरी सांप्रदायीक दिंडी लेझीम पथक तथा लयबद्ध बँड पथक सहभागी होऊन या शोभायात्रा रॅलीचे जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी व ढोलताशाच्या निदानात स्वागत करण्यात आले. तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने शोभायात्रा रॅली मार्गावर थंड पाणी मठ्ठा,शरबत,बर्फी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक जयस्तंभ चौक येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती मंदिरासमोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा न.प.चे माजी उपाध्यक्ष नितीन उमाळे यांच्यातर्फे जेसीपी द्वारे शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.तथापि मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन एमपीएससी,यूपीएससी परीक्षा पास करून नोकरी प्राप्त केली अशा सर्व विद्यार्थ्यांचा शील्ड व शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शोभायात्रा रॅली मार्गावर मुलींनी सडा रांगोळ्या टाकून रस्ता सुशोभित करण्यात आला होता.छत्रपती शिवाजी चौक,जयस्तंभ चौक व रामजीबाबा मंदिर चौक येथे नागरिकांना विशेष झाकीचे दर्शन प्राप्त झाले.शोभायात्रा रॅली मार्गावर दोन्ही बाजूंना शहरातील व गाव खेड्यातील महिलांनी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी रॅली बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गजबजलेल्या चौकातील तीनही झाॅक्या नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या. यावेळी मोर्शीच्या प्रभारी ठाणेदार पुष्पलता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समिती व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पथक परिश्रम घेतले.