जिल्ह्यात ईव्हीएमविरोधात जनआंदोलन उभारणार काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची माहिती
ग्रामपंचायतीत ठराव घेणार
यवतमाळ / प्रतिनिधी
यवतमाळ, ता. 10 : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला आहे. त्यामुळे इव्हीएमविरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 10) सहकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ईव्हीएम विरोधात ठराव घेतल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संघटन मजबुतीच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे नवनिर्वाचीत आमदार बाळासाहेब मांगुळकर यांचा सत्कार कार्यक्रम पार पडल्याची माहिती दिली.
ईव्हीएमविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने फॉर्मेट तयार करण्यात आला असून, आता संपूर्ण जिल्हा पिंजून काढल्या जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारांचा समावेश मोठ्या प्रमाणात झाला आहे. बाहेर जिल्ह्यातील मतदारांची नावे यादीत समाविष्ठ करण्यात आली होती. हे कृत्य भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांनी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बहुतांश उमेदवार ईव्हीएममधील गडबड घोटाळ्यामुळेच आल्याचेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काही गावात अपेक्षेपेक्षा खूप कमी मते मिळाली. त्या गावातील नागरिकांनीसुद्धा यावर संशय व्यक्त केला आहे. आता आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी चालू करण्यात आली आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या असून, त्यात सूचनांनुसार सुधारणा केली जाणार आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे पक्ष संघटनांवर अधिक भर दिल्या जाणार आहे. निवडणुकीच्या काळात पोलिंग बूथ, गावाची जबाबदारी सांभाळणार्यांचा सन्मानसुद्धा केल्या जाणार आहे. काँग्रेसला मजबूती आणण्यावर भर दिल्या जाणार आहे. ईव्हीएमविरोधात प्रत्येक ग्रामपंचायतीत ठराव घेतल्या जाणार असून, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या दृष्टीने नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहे. आगामी काळात करण्यात येणार्या आंदोलनाचे लवकरच नियोजन केल्या जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. निवडणुकीच्या काळात काही पदाधिकार्यांनी विरोधात कामे केली आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठपातळीवर पाठविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, आमदार बाळासाहेब मांगुळकर, अॅड. शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार, प्रा. वसंतराव पुरके, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, संतोष बोरले, जावेद अन्सारी यासह काँग्रेसचे इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.