वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपजिल्हा रुग्णालय व जणता नगर येथील बाळासाहेब ठाकरे दवाखाना येथे नवीन डॉक्टर्स यांची नियुक्ती करून तात्काळ कामावर रुजू करा – संभाजी ब्रिगेड यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र दोनच डॉक्टर व बोटांवर मोजण्याएवढे आरोग्य कर्मचारी या रुग्णालयाचा डोलारा सांभाळत असून प्रसूतितज्ञ नसल्याने गरोदर महिलांची गैरसोय होत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत अतिशय अल्प मनुष्यबळ आणि उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची वाढलेली संख्या याचा विचार केल्यास येथील आरोग्य सेवेची हाडे खिळखिळी झाली आहेत.
रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसूतितज्ञ, बालरोगतज्ज्ञ, शस्त्रक्रियातज्ज्ञ, चर्मरोगतज्ञ नसून मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून केवळ दोन कार्यरत आहेत. रुग्णांना व नातेवाईकांना पाण्याची कोणतीच सोय उपलब्ध नाही. स्वच्छता अजिबात नाही. सर्व भिंतींवर जाळे पसरलेले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरातील जनता नगर येथे 1 में 2023 रोजी बाळासाहेब ‘ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. या ठिकाणी सर्व औषध-उपचार व तपासणी मोफत असल्यामुळे रुग्णांची गर्दी व्हायला लागली. 200 ते 250 रुग्ण रोज़ यायचे. मात्र दरम्यान च्या काळात तेथील महिला डॉक्टर सोडून गेल्याने येथे कुणीच वाली राहिला नाही व आता परिचारिकेला तपासणी करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे दवाखाने सुरू केल्या गेले मात्र पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हा डोलारा सांभाळायचा कुणी ? आर्वी येथे डॉक्टर यांनी राजीनामा दिल्याने हा दवाखाना वाऱ्यावर आहे. सध्या फक्त परिचारिकांच्या भरवशावर सीबीसी, थायरॉइड, कोलेस्टरोल कामकाज सुरू असून शुगर तपासणी केली जाते.
आपण तत्काळ आदेश देऊन नवीन डॉक्टरची नियुक्ति करावी व त्यांना पदभार देऊन कामावर रुजू करावे. अशी मागणी रोहण दादा हिवाळे यांच्या कडून महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनात करण्यात आली आहे