अवैध गो-मास विक्रेत्यावर गुन्हा दाखल
लाखनी प्रभाग क्रमांक १० मधील घटना
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भंडारा/लाखनी:- अवैध गो मास विक्रीवर अंकुश लागावा. या करिता शासनाने अनेक कठोर कायदे केले असले तरी यास तिलांजली देऊन खुलेआम गो मास विक्री सुरू असल्याचा प्रत्यय प्रभाग क्रमांक १० लाखनी येथे उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे पथकाने छापा मारून गो मास विक्रेत्यास साहित्यासह पकडून प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव वकील नझीर कुरेशी(४०) प्रभार क्रमांक १० लाखनी असे आहे.
शहरातील बुरड मोहल्ला प्रभाग क्रमांक १० येथे अवैध गो मास विक्री सुरू असल्याच्या गुप्त माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तूरकुंडे यांचे नेतृत्वातील पथकाने छापा मारला असता गो मास विक्री करतांना वकील कुरेशी यास रंगेहाथ पकडून त्याचेकडून ५५ किलो गो मास १५० रुपये प्रती किलो प्रमाणे ८ हजार २५० रुपयासह लोखंडी काता, लोखंडी सूरी, वजन काटा, १ किलो चा वजन माप व लाकडी कुंदा इत्यादी ९ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एपीआय नारायण तूरकुंडे यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३८९/२०२३, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ९, ९(अ) तसेच सहकलम ४२९ भादवि अन्वये वकील नझीर कुरेशी याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार केशव नागोसे तपास करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध गो मास विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.