अवैध गोवंश तस्करी करणारे वाहन मोर्शी पोलिसांच्या ताब्यात
मोर्शी (संजय गारपवार)
अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्या एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकला मोर्शी पोलिसांनी रोखून ट्रकसह ड्रायव्हर व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.सदर घटना शनिवारी रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान मोर्शी अमरावती रोडवर असलेल्या परशुराम पॅलेस समोर घडली.
महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा करून सुद्धा कायद्याला धाब्यावर बसवून मध्यप्रदेशातून गोवंशाची अवैध्य तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
दि.29 जुलै रोजी वरुड येथून एक आयशर ट्रक क्र.एम एच 34/बी झेड 1008 मध्ये अमानुषरित्या कोंबून अवैध्य गोवंश वरुड मार्गे बेनोडा वरून मोर्शीकडे येत असल्याची गोपनीय माहिती मोर्शी पोलिसांना प्राप्त झाल्यावर मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी तातडीने सापळा रचून त्यांची अधिनस्त पोलीस चमु यांनी पाळत ठेवून स्थानिक परशुराम पॅलेससमोर पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक पकडण्यात यश प्राप्त केले.या ट्रकमध्ये जवळपास 58 वगार जातीचे गोवंश आढळून आले असून सदर गोवंश वरुड येथून लोड करून ते बडनेरा येथे नेत असल्याचे ट्रक ड्रायव्हरने सांगितले.मोर्शी पोलिसांनी त्वरित गोवंशाना केकतपूर गौरक्षणमध्ये चाऱ्या पाण्यासाठी रवाना करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत असलेली गोवंशाची अवैध्य वाहतूक डोकेदुखी ठरत असून या अगोदर सुद्धा आयशर गाडीने बॅरिगेट व पोलिसांना उडविण्याच्या घटना घडल्या तरी शासनाने या अवैध तस्करीवर वेगळा कायदा अमलात आणावा व आरोपी विरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी जोर धरत आहे.गोवंश तस्करी करणाऱ्यांची हिंमत पोलिसांना उडवण्याइतकी कशी होत आहे.यावर कोणाचा वरदहस्त आहे की काय?अशी चर्चा सुद्धा मोर्शी शहरात सुरू आहे.गोवंशाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या तस्करीला आळा घालण्यासाठी गोवंश विकणाऱ्यांवर व गोवंश घेणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी सुद्धा जनतेची मागणी आहे.