संशोधन पद्धतीवर डॉ. जयश्री कुलकर्णी यांचे व्याख्यान
अचलपूर / प्रतिनिधी
अमरावती शहरातील अस्मिता शिक्षण संस्थेद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये शनिवार, दि. ०९ मार्च २०२४ रोजी संगीत विभागातर्फे विद्यार्थ्यांकरीता विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रात आता संशोधनाचे महत्व फार वाढत आहे. गेल्या वर्षीपासून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सर्व विद्यशाखेला ‘संशोधन पद्धती आणि बौद्धिक संपदा अधिकार’ हा विषय अनिवार्य केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय समजावून सांगण्याच्या दृष्टीकोनातून वरील विषयावर विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन महाविद्यालयातील संगीत विभागाने केले. या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक प्रा. डॉ. जयश्री कुलकर्णी उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. मीनल ठाकरे उपस्थित होत्या.
विद्या व कलेच्या देवता माता सरस्वतीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर संगीत विभागातील प्रा. गजानन काळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर ‘संशोधन पद्धती आणि बौद्धिक संपदा अधिकार’ या विषयावर डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रस्तुत विषयावर बोलतांना जयश्री कुलकर्णी यांनी संशोधनाचा अर्थ, व्याख्या, आचार्य पदवीचे संशोधन कार्यातील महत्वपूर्ण टप्पे, संशोधनाचा विषय कसा ठरवावा, बौद्धिक संपदा अधिकार स्वरूप व महत्व अशा घटकांवर प्रकाश टाकला. त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून डॉ. मीनल ठाकरे यांनी संगीत आणि इतर विषयांसोबतच संशोधन दैनंदिन जीवनाचा सुद्धा भाग कसा असतो हे स्पष्ट करून संशोधनाचे महत्व सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. गजानन काळे यांनी केले. संगीत विभागातील प्रा. डॉ. सोनाली शिलेदार, प्रा. जगन्नाथ इंगोले, प्रा. प्रज्ञा इंगळे तसेच भरपूर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम झाल्यावर प्राचार्य डॉ. डॉ. मीनल ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संगीत विभागातील सर्व प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांची स्तुती केली.