रुग्णमित्र- गजू कुबडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय थांबली
हिंगणघाट / अब्बास खान
येथील उपजिल्हा रुग्णालयात अपुऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कमतरतेने रुग्णाना बराच मानसिक त्रास सहन करावा लागत होता.या उपजिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभाराच्या विरोधात मागील दोन वर्षांपासून रुग्णमित्र- गजू कुबडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार व आंदोलनाच्या मार्गाने रुग्णालयाचे अनेक प्रश्न मार्गी लावले.
या उपजिल्हा रुग्णालयाच्या अव्यवस्थेविरुद्ध त्यांनी कोरोना काळात स्वतःच्या घराच्या छतावर भर उन्हाळ्यात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते.तर मागील वर्षी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर तीन दिवसाचे आमरण उपोषण केले होते.त्यांच्या सततच्या आंदोलनाची प्रशासनाने वेळोवेळी दखल घेतलेली आहे.
मागील दोन वर्षांपासून बंद असलेली सोनाग्राफी मशीन सुरू करावी यासाठी त्यांनी 24 एप्रिलला 45 डिग्री तापमानात अनवाणी पायाने अनोखे प्रायश्चित्त आंदोलन करून प्रशासनाला झुकवून मागणी मान्य करवून घेतली होती.
या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी वर्धा, जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा यांना दि.१७ एप्रिलला व दुसरे पत्र दि २४ एप्रिलला देऊन या सोनोग्राफी मशीनसाठी तज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.त्यानंतर त्यांच्या पत्राच्या आधारे जिल्हा शल्यचिकित्सकांनी 21 एप्रिलला या संदर्भात आरोग्य उपसंचालक नागपूर यांना पत्र पाठवून उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे त्वरित क्ष-किरण तज्ञाची नियुक्ती देण्याची विंनती केली होती.रुग्णमित्र- गजू कुबडे यांच्या आंदोलनाने गोरगरीब जनतेला न्याय मिळत आहे याबद्दल सामान्य जनता रुग्णमित्र- गजु कुबडे यांचे अभिनंदन करीत आहे.