वाघाचा हल्ला: गणेशपुरमध्ये भीतीचे वातावरण, नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान
भंडारा नवप्रहार प्रतिनिधी / हंसराज
भंडारा – गणेशपुर, दि. २९ जुलै: गणेशपुर स्मशानभूमी परिसर व ऑफिसर क्लब भंडारा यांची मागची बाजू नदी काठावर वाघाचा वावर आढळला आहे. सुरेश बडवाईक यांच्या मोठ्या बकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गणेशपुरचे शेतकरी कैलाश बडवाईक व सुनील साकोरे यांनी यशवंत सोनकुसरे, जिल्हा परिषद सदस्य गणेशपुर यांना फोन करून वाघाचे पंजे दिसल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर सर्वांनी पाहिले की, पंजे एका मोठ्या वाघाचे होते.त्याच दरम्यान, ३०० ते ४०० मीटर अंतरावर वाघाने सुरेश बडवाईक यांच्या मोठ्या बकऱ्यावर हल्ला केला व त्याला गंभीर जखमी केले. सुरेश बडवाईक व कांबळे जी यांनी वाघाला हुसकावून लावून आपल्या जनावराचा जीव वाचवला.
घटनेची माहिती वन विभागाला दिल्यावर वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. वन विभागाच्या संपूर्ण टीमने घटनास्थळाची पाहणी करून जखमी बकऱ्याचा व घटनास्थळाचा पंचनामा केला. वरिष्ठ अधिकारी ACF सचिन निलक आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले.सदर वाघाची हालचाल ट्रेस करण्यासाठी संपूर्ण परिसरात ट्रॅक कॅमेरे लावण्यात यावेत आणि नाईट विजनने परिसर पिंजून काढण्याची मागणी केली.
शहराचा लगत भाग असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर असतो. नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की दोन-चार दिवस त्या भागात जाणे टाळावे, ज्यामुळे कुठलीही अप्रिय घटना टाळता येईल. सर्वांनी सतर्क राहावे व सुरक्षित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गणेशपुरच्या नागरिकांनी वन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी. सद्यस्थितीत वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वन विभागाचे अधिकारी सांगतात की, वाघाचा वावर सामान्यतः रात्रीच्यावेळी अधिक असतो. त्यामुळे, नागरिकांनी रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळावे व जंगल परिसरात जाण्याचे टाळावे..