हॉटेलात रेव्ह पार्टीचे आयोजन ; पोलीस विभाग अनभिज्ञ
बारबाला नाचवल्या , दारू आणि अमली पदार्थाचे सेवन
मोक्का भोगलेल्या गुंडाकडून पार्टीचे आयोजन ?
कास पठार / प्रतिनिधी
कास पठाराला लागलेले बदनामीचे ग्रहण अधिक गडद होत आहे. इथल्या एका हॉटेलमध्ये रविवारची रात्र चर्चेचा विषय ठरली आहे. दारूसह अंमली पदार्थांचे सेवन करत बारबाला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार इथं घडल्याचं बोललं जात आहे.
कास पठार येथिल एका हॉटेल मध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे. या पार्टीत बारबाला नाचवण्याचा प्रकार घडला असून दारू आणि अमली पदार्थ वाढण्यात आल्याचे समजत आहे. साताऱ्यातील कुविख्यात गुंडाकडून या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. मुख्य म्हणजे यात गाड्या फिडणे , डोकी फोडणे आणि हत्याराने वार करण्यात आल्याचे समजते. ईतके सगळे होऊन देखील पोलीस या विषयाला घेऊन अनभिज्ञ आहेत हे विशेष.
निसर्गसंपन्न यवतेश्वर घाट ते कास पठार हा जणू रेडलाईट एरिया झालाय की काय? अशी शंका येत आहे. रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांसाठी रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत दारूसह अंमली पदार्थांचा वापर सर्रास केल्याचे समजत आहे. गुंडासह 20 सहकारी आणि 10 बारबाला असा लवाजमा पहाटेपर्यंत या हॉटेसमध्ये धुडगूस घालत होता.
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठार परिसरात हा प्रकार घडला आहे. हॉटेलमध्ये मध्यरात्री लागलेला डीजे काही किलोमीटर अंतरापर्यंत कानठळ्या बसवत होता. हा प्रकार या हॉटेलमध्ये पहिलाच नाही. असेही ग्रामस्थ आता सांगत आहेत. असल्या गुंड प्रवृत्तीच्या हॉटेलवाल्यांमुळे कास परिसर बदनाम होत असल्याचंही गावकरी सांगत आहेत. यामुळे मेढा पोलिसांनी अशा प्रवृत्तीच्या हॉटेल मालकाची ‘मल्हारवारी’ काढलीच पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
ही रेव्ह पार्टी सुरू असतानाच अचानक काही गंभीर गोष्टीही घडल्या आहेत. त्यातून कोयते, तलवारी नाचवण्यात आल्या. यामध्ये काही गाड्या ही फोडण्यात आल्या. तर तलवार कोयत्याने हाणामारी होवून काहींची डोकी ही फुटल्याचे आता समोर आला आहे. काहींच्यावर कोयत्याने वार झाले असंही सांगण्यात येत आहे. अंमली पदार्थ आणि दारू पिवून ही भांडणं झाली. बाटल्या डोक्यात फोडण्यात आल्या. बाटल्यांची फेकाफेकी झाल्यामुळे हॉटेलच्या काचाही फुटल्या आहेत. विशेष म्हणजे या रेव्ह पार्टीचा आयोजक असणाऱ्या मच्छीबाज गुंडांनेच नुकसानीची भरपाई दिल्याचे समजत आहे.
याच भागात काही दिवसांपूर्वी एका खासगी बंगल्यात एक रिल स्टारसह काहींना वेश्या व्यवसाय करताना पकडण्यात आले होते. यवतेश्वर घाट हा नशेली अड्डा झाला आहे की काय अशी स्थिती आहे. याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आली आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे या गुंडांवर आणि त्यांना रेवपार्टी करू देणाऱ्या हॉटेल मालकावर कोणती कारवाई केली जाते याकडे आता साताऱ्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे. की केवळ चौकशीचे नाटक करून पुन्हा जैसे थे स्थिती होणार याकडेही सर्वांची नजर आहे.