या कारणाने सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे भरले 18 लाख 88 हजार
मुंबई / नवप्रहार डेस्क
लोकसभा निवडणुकीत माजी खा.सुजय विखे पाटील यांना आ. निलेश लंके यांनी पराभूत केले आहे. मात्र, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता मतमोजणीवर आक्षेप घेत EVM आणि VVPAT च्या मोजणीची मागणी केली असून, त्यासाठी आवश्यक असलेले शुल्कही भरले आहे.
या सर्व घडामोडींमुळे नवे खासदार निलेश लंके यांनी धाकधूक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर निवडणुकीचा निकाल बदलणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
18 लाख 88 हजारांचे शुल्क
भाजपचे उमेदवा सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरची पडताळणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यानंतर अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सुजय विखेंची तक्रार महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. सुजय विखे यांनी एकूण 40 ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
यामध्ये एका केंद्रावरील EVM ची पाडताळणी करण्यासाठी 47 हजार 200 रुपये इतके शुल्क असून, विखे यांनी 40 केंद्रांवरील पाडताळणीसाठी एकूण 18 लाख 88 हजारांचे शुल्क भरले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर उभा असलेला उमेदवार ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरच्या चाचणीची मागणी करू शकतो. ज्या उमेदवाराने पडताळणी याचिका दाखल केली आहे त्याला कोणत्या मतदान केंद्राच्या ईव्हीएमची पडताळणी करायची आहे त्या EVM चा अनुक्रमांक काय आहे हे सूचित करावे लागेल.
अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके विजयी झाले आहेत. या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना 5,95,868 तर नीलेश लंके यांना 6,24,797 मते मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवार निवडणूक निकालानंतर ७ दिवसांच्या आत ईव्हीएम मायक्रोकंट्रोलरची पडताळणी करण्याची मागणी करू शकतो. त्यासाठी त्याला शुल्कही भरावे लागते. ईव्हीएम बनवणाऱ्या फर्मचे अभियंते ही चाचणी करतात.
तपासादरम्यान, ईव्हीएममध्ये टेम्पर झाले आहे का किंवा त्यात काही बदल करण्यात आले आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या छाननी प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवार उपस्थित राहू शकतात. सध्या त्यांची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे.