४४ कोटीच्या फसवणूक प्रकरणातील जनसंघर्ष अर्बन निधीचे तीन संचालक अटकेत
स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
दिग्रस: / प्रतिनिधी
जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेडचे संचालक प्रणित मोरे आणि साहिल जयस्वाल यांनी ठेवीदारांची ४४ कोटीने फसवणूक करून संचाकल ९ डिसेंबर पासून बेपत्ता होते. या प्रकरणी ठेवीदारांच्या तक्रारीवरून दि. १८ डिसेंबर रोजी दिग्रस पोलिसांनी प्रणित मोरे, साहिल जयस्वाल सह त्याच्या परिवारातील ५ संचालकावर विविध कलमांवय गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी, दिग्रस पोलीस करत होते. अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. अखेर दि. ३ जानेवारी रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील आरोपी साहिल जयस्वाल, अनिल जयस्वाल, पुष्पा जयस्वाल या तिघांना नागपूर येथून अटक केली. ४४ कोटीच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी प्रणित मोरे आणि त्याचे कुटुंबिय फरारच आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. अटक करण्यात आलेले पुष्पा जयस्वाल आणि अनिल जयस्वाल यांची प्रकृती खराब असल्याने दिग्रस न्यायालयाच्या आदेशाने रात्री दोघांची वैद्यकीय तपासणी करून यवतमाळ येथे पाठविण्यात आले तर साहिल जयस्वाल याला दिग्रस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. आज साहिल जयस्वाल ला दारव्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहे. तांत्रिक बाबी आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील तिन्ही आरोपिंना नागपूर येथून अटक करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर वैजने, एपीआय विजय महल्ले, सोहेल मिर्जा, किशोर झेंडेकर, अमित कुमार आणि स्थानिक गुन्हे शाखा, दिग्रस पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.