क्राइम
अरे महाराष्ट्रात हे चाललंय तरी काय ? पुन्हा ४० महिलांच्या आर्थिक आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण उघड

नवी मुंबई / विशेष प्रतिनिधी
राज्यात अशोक खरात, ऋषिकेश वैध असे एकामागून एक लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असताना एका लबाडा कडून ४० महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. मॅट्रोमोनी साइड वर जाऊन तो घटस्फोटीत, विधवा किंवा अविवाहित महिलांचा शोध घ्यायचा आणि मग त्यांना आपल्या प्रेम जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण करायचा.
अशोक खरात प्रकरणानंतर हे दुसरे मोठे प्रकरण असल्याने राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आदर्श म्हात्रे (वय ३५) असे या आरोपीचे नाव असून तो स्वतःला कधी इस्त्रोचा शास्त्रज्ञ तर कधी आयपीएस-आयएएस अधिकारी असल्याचे भासवून महिलांना जाळ्यात ओढत होता.
आदर्शची काम करण्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती. तो मॅट्रिमोनी संकेतस्थळांवरून अशा महिलांचा शोध घ्यायचा ज्या अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि वर्षाला २५ ते ३५ लाख रुपये कमावणाऱ्या महिलांवर तो लक्ष केंद्रित करायचा. स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी तो आलिशान गाड्यांचा वापर करायचा आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटी आयोजित करून विश्वास संपादन करायचा.
महिला त्याच्यावर विश्वास ठेवू लागल्यानंतर तो प्रेमाचे नाटक करत त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. त्यानंतर भावनिक दबाव टाकून त्यांच्या नावावर ३५ ते ४० लाख रुपयांचे कर्ज काढायला लावायचा. मिळालेली रक्कम तो आपल्या नातेवाईकांच्या खात्यावर वळवून स्वतः मात्र मौजमजा करण्यासाठी गोव्यासारख्या ठिकाणी पळून जायचा. फसवणूक पूर्ण होताच तो मोबाईल नंबर बंद करून संपर्क तोडायचा.
या प्रकरणात आतापर्यंत ४० गुन्हे दाखल झाले असून अजून सुमारे ५० महिलांनी सामाजिक बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपीचे गुन्हे नवी मुंबईपुरते मर्यादित नसून ठाणे, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक तसेच कर्नाटकातही त्याचा पसारा असल्याचे समोर आले आहे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली असून आरोपी विविध बनावट नावांनी वावरत होता. स्वप्नील वारूळ, हेमंत गायकर, रुद्रेश गोंधळी, जयेश सोनवणे, जयेश नाईक, आदित्य म्हात्रे आणि तन्मय म्हात्रे अशी त्याची अनेक ओळखी होत्या.
या घटनेमुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून मॅट्रिमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तींची खातरजमा केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत, असा इशारा दिला आहे.




